लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: केंद्र आणि राज्यात सत्ताधारी असणाऱ्या पक्षांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यांचे धोरण कृषिमाल निर्यातीला नव्हे तर, आयातीला प्रोत्साहन देणारे आहे. हे धोरण बदलण्यासाठी शेतकरी हिताच्या विरुध्द धोरण आखणारे जे राज्यकर्ते असतील, त्यांना बाजूला करण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

नाशिकरोड-देवळाली या राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे यांच्या मतदारसंघात रविवारी देवरगाव येथे आश्रमशाळा आणि मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. नाशिकमध्ये साखर कारखानदारी झाली. दुर्दैवाने नाशिक सहकारी साखर कारखाना बंद पडला. हा कारखाना सुरु करण्यासाठी आमदार सरोज अहिरे जेव्हा आपल्याकडे आल्या, तेव्हा वसंतदादा साखर संस्थेच्या माध्यमातून कारखान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले, असे पवार यांनी सांगितले. नाशिक सहकारी साखर कारखाना लवकरच सुरु होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. आदिवासींसाठी चांगली आश्रमशाळा, चांगले वसतिगृह, विजेची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय हवी. आमदार अहिरे यांनी सरकारकडून त्यासाठी लागणारी रक्कम मंजूर करून आणली. पुढील दोन वर्षांत या गोष्टी उभ्या राहून आदिवासी मुला-मुलींना एक चांगली सुविधा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा- नाशिकमध्ये माती स्नानाचा उत्साह, प्रतिष्ठितांचा सहभाग

पवार यांनी सत्ताधारी भाजपच्या कृषि धोरणावर नामोल्लेख न करता टिकास्त्र सोडले. आपण सर्वजण शेती करणारे लोक असलो तरी आज ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. नाशिक हा राज्यात उत्तम शेती करणारा जिल्हा असून या भागातून देशपातळीवर कांदा, द्राक्ष, डाळिंब, टॉमॅटो पाठवले जातात. या सगळ्याच्या मागे सरकार उभे राहिले आणि मदत केली तर केवळ महाराष्ट्राची नाही तर, देशाची गरज आपण भागवू आणि देशाच्या बाहेर शेतमाल पाठवू. मात्र, दुर्दैवाने तसे घडत नसल्याचे त्यांनी सूचित केले. विकास कामांचा प्रश्नावेळी सत्ता हाती नसली तरीही विविध मार्गांनी आपले प्रश्न सोडवून घ्यायचे तंत्र आम्हाला माहिती आहे. त्याचा वापर करून तुमचे जीवन कसे बदलेल यादृष्टीने काळजी घेतली जाईल, असे पवार यांनी सांगितले.

आणखी वाचा- जळगाव: रावेर तालुक्यात तरुणाचा खून; सहा संशयित ताब्यात

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात नऊ टक्के निधीची तरतूद कायम केल्याचे नमूद केले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. आजही काही प्रमाणात आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी अधिक लक्ष देण्याची गरज त्यांनी मांडली. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आ. सरोज आहिरे, आ. माणिक कोकाटे, मविप्र संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी उपस्थित होते.