साधारणत: दीड दशकांपूर्वीची गोष्ट. प्रदीर्घ काळ मुंबईच्या राजकारणात रमल्यानंतर मूळ गावाचा (नाशिक) रस्ता पकडणारे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी या कालावधीत जो काही उत्कर्ष साधला, तो भल्याभल्यांचे डोळे दिपविणारा ठरला. अर्थात, भुजबळ कुटुंबीयांच्या अफाट वेगाने होणाऱ्या भरभराटीचे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेदेखील साक्षीदार म्हणता येतील. कारण, चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या ‘आर्मस्ट्राँग एनर्जी’च्या प्रकल्पाचे काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले होते.
इतकेच नव्हे, तर हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित राष्ट्रवादीच्या भव्यदिव्य अधिवेशनाची बक्षिसी पक्षाने समीर यांना २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तिकिटाद्वारे दिली होती. जिल्ह्यात भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्या आणि संस्थेचे प्रस्थ सर्वाच्या नजरेत ठळकपणे भरेल असे विस्तारले. या सर्वाची चौकशी सक्तवसुली संचालनालयासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केली आहे.
मुंबईत शिवसेनेचे बाळा नांदगावकर यांच्याकडून पराभूत झाल्यावर भुजबळ यांनी पुढील काळात म्हणजे २००४ मध्ये राजकीय नशीब अजमावण्यासाठी नाशिक गाठले. दुर्लक्षित आणि दुष्काळी अशी ओळख असलेल्या येवला मतदारसंघात त्यांनी पाय रोवले. सलग तीन वेळा ते याच मतदारसंघातून निवडून आले. काँग्रेस आघाडीच्या सत्ताकाळात उपमुख्यमंत्रिपद भूषविताना सार्वजनिक बांधकाम विभागाची सूत्रे त्यांनी आपल्याच हाती ठेवली.
जिल्ह्यातील सर्व सत्ताकेंद्र ताब्यात घेणाऱ्या भुजबळांचा शब्द या काळात प्रमाण मानला जाऊ लागला. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत वावरणाऱ्या भुजबळांभोवती लाभार्थ्यांची मोठी मांदियाळी दृष्टिपथास पडायची.
भुजबळांचे निकटवर्तीय म्हणून वावरणाऱ्यांची याच काळात भरभराट झाली. त्याचे प्रत्यंतर समीर भुजबळांच्या वाढदिवशी स्थानिक पदाधिकाऱ्याने भेट म्हणून दिलेल्या किमती आलिशान मोटारीने आले. विकासाची हाळी देताना सर्व काही भव्यदिव्य अन् आकर्षक ठेवण्याकडे त्यांचा कल राहिला. यामुळे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शहरातून जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजीने परिसर उजळून टाकला होता.
ओझर विमानतळ इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात त्याची पुनरावृत्ती झाली. त्या ठिकाणी तर फटाक्यांच्या आतषबाजीने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सुखोई विमाने बनविणाऱ्या कारखान्याच्या परिसरातील गवताला आग लागण्याची दुर्घटना घडली. परंतु, एचएएल व्यवस्थापनाने मौन बाळगून सत्ताधाऱ्यांविरुद्ध काही न बोलणे हिताचे मानले.
साधारणत: ८ वर्षांपूर्वी नाशिकच्या हुतात्मा स्मारक मैदानावर आयोजित राष्ट्रवादीचे अधिवेशन हे देखील त्याच भव्यतेचे प्रतीक ठरले. व्यासपीठाची रचना, अत्याधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणा आणि एकूणच अधिवेशनाच्या नियोजनात नेत्यांचा जो काही राजेशाही थाट ठेवला गेला, त्यावर वरिष्ठ बेहद्द खूश झाले. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी समीर भुजबळ यांच्या नियोजन कौशल्याचे जाहीर सभेत कौतुक केले.
या कामाचे फळ लोकसभा निवडणुकीत पक्षाने विद्यमान खासदाराचा पत्ता कट करून समीरला उमेदवारीच्या रूपात दिले. नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर भुजबळ कुटुंबीयांच्या आर्मस्ट्राँग कंपनीचा भव्य वीज निर्मिती प्रकल्प दृष्टिपथास पडतो. काही वर्षांपूर्वी या प्रकल्पाचे उद्घाटन शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते.
मुंबईहून येवल्यात आल्यावर ‘येवला-लासलगाव फेस्टिव्हल’ त्यानंतर ‘नाशिक फेस्टिव्हल’ याव्दारे भुजबळ यांनी हिंदी-मराठीतील तारे-तारकांना जिल्ह्य़ात आणून आपले त्यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंधही दाखवून दिले.
मुंबई ते नाशिक : आलिशान भुजबळशाहीचा प्रवास
छगन भुजबळ यांनी या कालावधीत जो काही उत्कर्ष साधला, तो भल्याभल्यांचे डोळे दिपविणारा ठरला.
Written by अनिकेत साठे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-03-2016 at 04:03 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political journey of chhagan bhujbal