धुळे – विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय धुळ्यात होण्यासाठी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील नेत्यांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवावेत, असे आवाहन ठाकरे गटाने केले आहे. शिष्ठमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन भावना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव येथे विभागीय कार्यालय झाल्यास पश्चिम खान्देशातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांवर अन्याय होणार आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी असलेल्या या विभागात बुलढाणा जिल्ह्याचा समावेश संयुक्तिक नाही. बुलढाण्याची नाळ ही विदर्भाशी जोडली गेली आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्याचा भौगोलिक विचार केल्यास नंदुरबारमधील नवापूर, धडगाव, खापर, अक्कलकुवा, धुळे येथील पिंपळनेर, साक्री, दहिवेल वार्सा पर्यंतच्या पश्चिम भागातील आदिवासी बांधवांसाठी जळगाव येथे होणारे कार्यालय भौगोलिक व दळणवळणाच्या दृष्टीने संयुक्तिक नाही. शासनाने याआधीच जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ देवून विकासाचा अनुशेष भरून काढला आहे. धुळे जिल्ह्याने अनेकदा विकास प्रकल्पांसाठी आवाज उठविला आहे. त्यात आरोग्य विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि आता मागणी असलेले कृषी विद्यापीठ, परंतु शासनाने या सर्व मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – रक्तमिश्रित पाणी नदीपात्रात, मालेगावात आंदोलन

धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी आपले राजकीय जोडे बाजूला सारून पश्चिम खान्देश विभागाप्रती आपली राजकीय अस्मिता जिवंत ठेवण्याचे आवाहन ठाकरे गटाने केले आहे. निवेदन देताना सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, हिलाल माळी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे आदी उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Political leaders should forget party differences for divisional office in dhule thackeray group appeal ssb
Show comments