एरव्ही कोणतेही आंदोलन वा मोर्चा म्हटला की, राजकीय पक्षांचे नेते व पुढारी ही मंडळी अग्रभागी राहत असल्याचे नेहमीच दृष्टिपथास पडते. तथापि, शनिवारी नाशिक येथे आयोजित मराठा क्रांती मूक मोर्चा त्यास अपवाद ठरणार आहे. राज्यात लाखोंच्या संख्येने निघणाऱ्या मूक मोर्चामागे नेमके कोण आहे, याचा शोध सत्ताधाऱ्यांकडून घेतला जात असताना आणि काही ‘मराठा’ राजकीय पुढाऱ्यांनी त्याचे श्रेय लाटण्याचाही प्रयत्न केला असल्याने मोर्चासाठी निश्चित झालेल्या क्रमवारीत पुढारी, नेते व मान्यवरांना सर्वात शेवटचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या मोर्चाची माहिती देण्यासाठी सध्या मराठा पुढारी धडपडत असले तरी प्रत्यक्ष मोर्चात ही मंडळी अग्रभागी राहणार नाही, याची तजवीज करण्यात आली आहे.
मराठा क्रांती मूक मोर्चाचे नियोजन गावोगावी युद्धपातळीवर सुरू असून इतर जिल्ह्यांप्रमाणे नाशिकच्या मोर्चातही विक्रमी गर्दी व्हावी, यासाठी सर्व घटक कार्यप्रवण झाल्याचे चित्र आहे. औरंगाबादपासून श्रीगणेशा झालेल्या मोर्चातील गर्दी उत्तरोत्तर वाढत असल्याचे हिंगोली, नांदेड, लातूर व जालना येथे अधोरेखित झाले. विशेष म्हणजे, लाखोंच्या संख्येनेपण अतिशय शांततेत व शिस्तबद्धपणे निघणाऱ्या मोर्चात युवती व महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. या मोर्चातील प्रचंड गर्दीने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मूक मोर्चाद्वारे प्रगट होणारी अस्वस्थता कोणाविरुद्ध आहे, याचा अंदाज संबंधितांकडून बांधला जात आहे. सत्ताधारी भाजपने काही मराठा नेत्यांशी चर्चा करत मराठा समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. तथापि, ज्या घटकांशी सरकारने चर्चा केली, त्यांना समाजाने चर्चेचा अधिकार दिला नसल्याची प्रतिक्रिया उमटली. राज्यात मोठय़ा संख्येने असणाऱ्या या समाजाच्या नाराजीचा फटका आपल्याला बसू नये, यासाठी सत्ताधारी भाजप, शिवसेनेसह विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या पक्षांतील मराठा नेते मोर्चाला रसद पुरविण्यासाठी पुढे सरसावले आहेत. नाशिकमधील नियोजन बैठकाही त्यास अपवाद राहिल्या नसल्याचे लक्षात येते.
कोणताही राजकीय पक्ष वा पुढाऱ्याच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार नसल्याने नेत्यांनी ‘मराठा’ म्हणून मोर्चात सहभागी व्हावे, असे आधीच सूचित करण्यात आले होते. शनिवारच्या मोर्चाचे नियोजन अंतिम टप्प्यात आले असून मोर्चातील क्रमवारी कशी राहणार, याची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार मोर्चात सर्वात पुढे लहान मुली व युवती राहणार आहेत.
म्हणजे मोर्चाचे नेतृत्व संबंधितांकडून केले जाईल. त्यानंतर वकील, अभियंते, व्यापारीवर्ग, महिला, लहान मुले व युवकवर्ग, पुरुष व ज्येष्ठ मंडळी अशी ही क्रमवारी राहील. या क्रमवारीत सर्वात शेवटी पुढारी, राजकीय नेते व मान्यवर राहणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. राजकीय पक्ष, पुढारी वा नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नाही हे दर्शविण्यासाठी जाणीवपूर्वक संबंधितांना अखेरचे स्थान देण्यात आल्याचे दिसते.
तपोवन येथून निघणारा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यानंतर मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या युवतींमधील एका युवतीकडून निवेदनाचे वाचन होईल. त्यानंतर पाच युवती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील. म्हणजे, या ठिकाणी राजकीय नेत्यांना चार हात दूर ठेवण्यात येणार आहे. युवती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आल्यानंतर मोर्चा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाईल. त्या ठिकाणी राष्ट्रगिताद्वारे मोर्चाचा समारोप होईल. मोर्चाच्या नियोजनाबद्दल राजकीय नेते सध्या माहिती देत आहेत. परंतु, प्रत्यक्ष मोर्चावेळी संबंधितांना अग्रभागी न ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.