लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: बेरोजगारीचा विषय राजकीय पटलावर नेहमीच चर्चेत असल्याने भाजप, शिवसेनेपाठोपाठ आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही (अजित पवार गट) नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून मतांची पेरणी करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे आयोजित मेळाव्यात ५० हून अधिक कंपन्यांच्या माध्यमातून सुशिक्षित युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात आली. माजी खासदार समीर भुजबळ यांनी या महोत्सवासाठी पुढाकार घेऊन एकप्रकारे विद्यमान खासदारांना शह देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी भवन येथे आयोजित नोकरी महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शहरात प्रथम बेरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी याच स्वरुपाचा मेळावा घेऊन सुशिक्षितांना साद घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी दीड हजार युवकांना जागेवर नियुक्तीपत्र दिल्याचे सांगितले गेले होते. सत्तेत सहभागी झालेल्या अजितदादा गटाने नव्या मित्रांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. विशेष म्हणजे नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी या महोत्सवाचे नियोजन केले. तिन्ही पक्षांच्या उपक्रमांची वेगवेगळी नावे असली तरी सर्वांचा उद्देश बेरोजगारांना रोजगार अर्थात नोकरी मिळवून देणे हाच आहे. शिवसेना खासदाराप्रमाणे महोत्सव घेऊन राष्ट्रवादीला नेमका काय संदेश द्यायचा आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
आणखी वाचा-नाशिक: शेतात सर्पदंशाने वृध्देचा मृत्यू
उद्घाटनप्रसंगी भुजबळ यांनी जिल्ह्यात कृषी आणि वैद्यकीय पर्यटनाला अधिक वाव असल्याकडे लक्ष वेधले. पुढील काळात माहिती तंत्रज्ञान हबसह अन्य उद्योग वाढविण्यासाठी प्रयत्न करून स्थानिक पातळीवर युवकांना नोकरीच्या संधी निर्माण करण्यात येतील. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राज्य शासन बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे. आझादी का अमृत महोत्सवाच्या माध्यमातून ७५ हजार शासकीय नोकरी देण्याचा शासनाचा मानस आहे. जिल्ह्यात विविध विकासाची कामे करून उद्योगांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. पक्षाने तरुणांना रोजगारासह, स्वयंम रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. मुख्यमंत्री स्वयंम रोजगार योजनेच्या माध्यमातून खाद्य विक्री वाहनांचे वाटप केले आहे. पुढील काळात तरुणांना रोजगार मिळण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातील, असे सांगण्यात आले. महोत्सवासाठी साडेआठ हजारहून अधिक जणांनी नोंदणी केली होती. तर तीन हजारहून अधिक युवकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. ५० हून अधिक कंपन्यांनी सहभागी होऊन नोकऱ्यांसाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी राहिला आहे. अशा उपक्रमातून राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केल्याचे दिसत आहे.