दीपावलीला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष्मीपूजन व इतर दिवशी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजण्याची तयारी केली आहे. तत्पूर्वी, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या केवळ ‘ब्रॅण्डेड’ फटाक्यांच्या आवाजाचे मापन करण्यात आले. उर्वरित फटाक्यांचे मापनच केले नाही. त्यामुळेच दिवाळीत ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडणारे फटाके आधीच्या तपासणीत मात्र नियमांचे उल्लंघन करणारे ठरले नाहीत, हे विशेष. दरवर्षी ध्वनिप्रदूषण मापनाचा सोपस्कार पार पडत असला तरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. यामुळे यंदाही शासकीय यंत्रणांच्या नाकावर टिच्चून फटाक्यांच्या दणदणाटात उत्सव साजरा होणार असल्याचे दिसत आहे.
दिवाळीच्या कालावधीत आवाजाच्या तीव्रतेचे मोजमाप करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे शहरात ठिकठिकाणी ध्वनी पातळी मोजण्याची मोहीम हाती घेतली जाते. या काळात सकाळी सहा ते रात्री बारा या कालावधीत फटाके उडविण्यास परवानगी आहे. फटाक्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या काही विशिष्ट रासायनिक घटकांवर बंदी घालण्यात आली आहे. अशा घटकांचा अंतर्भाव असणाऱ्या फटाक्यांचा वापर किंवा विक्री झाल्यास ही बाब नियमांचे उल्लंघन या सदरात मोडू शकते.
दरवर्षी ध्वनीची पातळी मोजण्याची प्रक्रिया धनत्रयोदशीच्या दिवसापासून सुरू होते. पुढील काही दिवस सलगपणे काही विशिष्ट भागात ही तपासणी केली जाते. ध्वनीची पातळी सर्वसाधारणपणे ५५ ते ६० डेसिबलपर्यंत असते. शहरातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या कारणांमुळे या पातळीत चढ-उतार होत असते. अधिकाधिक ८० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन केला जाऊ शकतो. त्या पुढील तीव्रतेचा आवाज मात्र सहन करण्यापलीकडे जातो. दिवाळीत फटाक्यांमुळे ही पातळी १०० डेसिबलच्या पुढे जाऊ शकते. फटाक्यांच्या प्रकारानुसार एका फटाक्यास १२५ तर फटाक्यांची माळ अर्थात लडीसाठी १४५ डेसिबलपर्यंतच्या आवाजाला शासनाने संमती दिली असल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. या संदर्भातील नियमांचे उल्लंघन करताना कोणी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचा अधिकार प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेला आहे.
यंदा बुधवारपासून शहरातील सीबीएस, पंचवटी, दहीपूल, बिटको चौक आणि सिडको या भागात फटाक्यांच्या आवाजाचे ध्वनिमापन करण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजन व तत्सम दिवशी प्रमुख बाजारपेठांमध्ये पाच ते दहा हजारांच्या माळांवर अधिक भर असल्याने हा परिसर आवाजाने दुमदुमून जातो. निवासी भागात आवाजापेक्षा ‘फॅन्सी’ प्रकारांना पसंती दिली जाते. यंदा नेहमीप्रमाणे उपरोक्त भागात आवाजाची तीव्रता मोजली जाणार असल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले. ‘नॉइज मीटर’च्या साहाय्याने मापनाचे हे काम केले जाते. या कामासाठी मंडळाकडे पुरेशी यंत्रणा व जादा मनुष्यबळ नसल्याने हे काम आऊटसोर्सिगच्या तत्त्वावर केले जाईल. ध्वनी पातळीचे मापन करताना नेहमीप्रमाणे प्रदूषणाची विहित मर्यादाही ओलांडली जाईल. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे अधिकार ज्या प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन व पोलिसांना आहे, त्या यंत्रणा दणदणाटाकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करतात, असा आजवरचा अनुभव आहे. यंदाच्या दिवाळीत त्यापेक्षा वेगळी काही घडण्याची शक्यता नसल्याचा नाही.

फटाक्यांची तपासणी
दिवाळीला सुरुवात होण्याआधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक विभागाने बाजारात विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांच्या ध्वनिमापनाची तपासणी केली आहे. ही तपासणी केवळ ब्रॅण्डेड फटाक्यांची केल्यामुळे इतर कंपन्यांच्या फटाक्यांकडून कानठळ्या बसणार यावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब झाले आहे. या प्रक्रियेंतर्गत सात ब्रॅण्डेड फटाक्यांची तपासणी केली गेली. त्यात लडींसह एका फटाक्यांचा समावेश होता. पण, त्यात कोणताही फटाका नियमांचे उल्लंघन करणारा नसल्याचे मंडळातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Story img Loader