नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार शिरीष नाईक आणि त्यांच्या पत्नी रजनी नाईक यांनी प्रत्येकी चार अर्ज घेतल्याने काँग्रेसकडून उमेदवार बदलण्यात येईल की काय, अशी चर्चा रंगली आहे.
नंदुरबार लोकसभा रणधुमाळीआधी काँग्रेसने घेतलेल्या इच्छुकांच्या मुलाखतींंमध्ये माजी आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आणि आमदार शिरीष नाईक यांच्या पत्नी रजनी नाईक यांचे नावे चर्चेत होते. या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळाल्यास भाजपविरुद्ध चांगली लढत देता येईल, अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. परंतु, काँग्रेसच्या वरिष्ठांनी राजकारणापासून दूर असलेले ॲड. गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर करुन सर्वांनाच धक्का दिला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अगदी नवखे असलेले गोवाल पाडवी लोकांमध्ये मिसळून आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गोवाल यांना उमेदवारी जाहीर झाली असल्याने त्यांनी आपल्यासह वडील के.सी. पाडवी आणि आई हेमलता पाडवी यांच्या नावाने कॉग्रेससाठी प्रत्येकी चार अर्ज घेतले. उमेदवारी अर्ज वितरणाच्या दुसऱ्या दिवशी अर्ज घेणाऱ्या दोन नावांमुळे सर्वांना धक्का बसला.
हेही वाचा… नाशिकमध्ये शिंदे गटाचा मार्ग मोकळा; गोडसे की बोरस्ते ?कोणाला उमेदवारी?
हेही वाचा… त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
काँग्रेससाठीच आमदार शिरीष नाईक आणि त्यांच्या पत्नी रजनी नाईक यांनी देखील प्रत्येकी चार अर्ज घेतले. त्यामुळे काँग्रेस उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिमक्षणी नवा धक्का देणार की काय, याबाबत चर्चा रंगु लागली आहे. गोवाल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही उमेदवारी रजनी नाईक यांनाच मिळावी, असे कार्यकर्त्यांमध्ये म्हटले जात होते. सुरुपसिंग नाईक परिवाराचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात असलेला वैयक्तीक जनसंपर्क पाहता रजनी नाईक यांना उमेदवारी मिळाल्यास खासदार डॉ. हिना गावित यांना निवडणूक जड जाण्याचेही सांगितले जात होते. परंतु, गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या चर्चांना विराम मिळाला. परंतु, दस्तूरखुद्द माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी उमेदवारीच्या माघारीपर्यत कोणाच्या उमेदवारीचे काहीच खरे नसते. आपल्या मुलाला उमेदवारी मिळाली असली तरी माघारीनंतरच अंतिम चित्र स्पष्ट होईल, असे वास्तव मांडले होते. त्यामुळेच नाईक परिवाराने अर्ज घेणे, ही बाब सर्वजण गांभिर्यांनेच घेत आहेत.