नाशिक – देवळा, कळवण, सटाणा या तालुक्यांची शान असलेला विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखाना (वसाका) सुरु करण्यासंदर्भात पुन्हा एकदा हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. आमदार डाॅ. राहुल आहेर यांनी त्यासंदर्भात सुतोवाच केल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसाका कारखाना काही वर्षांपासून बंद आहे. परिणामी, कारखाना क्षेत्रातील ऊसक्षेत्रही घटले आहे. जलस्त्रोत कमी झाल्याचा परिणामही ऊसशेतीवर झाला आहे. विठेवाडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात आ. डाॅ. राहुल आहेर यांनी हा विषय मांडला. देवळा तालुका जलसमृद्ध करण्यासाठी गिरणा नदीपात्रात कोल्हापूर पध्दतीचे बंधारे उभारत कायमस्वरूपी सिंचनासाठी पाणी अडवून विकासाचे केंद्रबिंदू असलेला ‘वसाका’ भविष्यात ऊस लागवडीच्या माध्यमातून सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

या मेळाव्यात आमदार आहेर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक बाबुराव पाटील हे होते. व्यासपीठावर माजी संचालक वसंतराव निकम, अशोक बोरसे, भास्कर निकम, उमराणे बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे उपस्थित होते.

अनेक दिवसांपासून वसाका बंद अवस्थेत आहे. कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध नसल्याने गेट केनच्या भरवशावर कारखाना चालवणे कठीण असल्याचे आमदार आहेर यांनी सांगितले. यासाठी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना बाराही महिने पाण्याची उपलब्धता राहिली तरच ऊस लागवडीकडे शेतकरी वळेल. यासाठी पावसाळ्यात विठेवाडी येथे बंधाऱ्यात पाणी आणणार असून भविष्यात गिरणा नदीच्या अवर्तनात थोडा फार बदल झाला तर याच वर्षी सावकी येथील कोल्हापूर पध्दतीचा बंधारा पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे. तसे झाल्यास याच पावसाळ्यात दोनही बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवण्याचा प्रयत्न आपण करणार असून भविष्यात तालुक्यातील सुरुवातीपासून शेवटपर्यंत नदीपात्रात गावालगत कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे गिरणा नदीपात्रालगतच्या दोनही बाजूच्या गावांना त्याचा लाभ होऊन शेती, पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. आहेर यांनी व्यक्त केला.

देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसाका कारखाना बंद असल्याने तालुक्याच्या विकासावर त्याचा परिणाम झाला आहे. या कारखान्यामुळे ऊस उत्पादकांना आधार मिळण्यासह शेकडो कामगारांना काम मिळाले होते. परंतु, अनेक वर्षांपासून कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले. कामगारांना इतर काम मिळविण्यासाठी भटकंती करावी लागली आहे.