समाजमाध्यमात गुरफटलेल्या सध्याच्या काळात कधी काळी बालपणात खेळला जाणारा ‘माझ्या मामाचं पत्र हरवलं’ खेळ जसा लुप्त झाला तसेच खरेखुरे पोस्टमनकाका, पत्रेही अंतर्धान पावली की काय, अशी शंकाही व्यक्त केली जाते. या पाश्र्वभूमीवर, भारतीय टपाल विभाग टपालाचे महत्त्व अधोरेखित व्हावे, या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा यासाठी विविध उपक्रमांतून प्रयत्नशील आहे. याअंतर्गत ‘मेरा टिकट’ हा अनोखा उपक्रम डाक विभागाने मांगीतुंगी सोहळ्यात सुरू केला आहे; पण त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. आपले छायाचित्र समाविष्ट असणारे टपाल तिकीट असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. मागील पाच ते सहा दिवसांत केवळ ८० भाविकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.
भारतीय डाक विभागाने माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विविध योजनांच्या माध्यमातून सक्रिय होत अभिनव संकल्पना राबविल्या. बदलत्या तंत्रज्ञानाने पत्रव्यवहारातून होणारी संवादाची जागा काही अंशी समाजमाध्यमांनी घेतली. दूरध्वनी, भ्रमणध्वनी, फॅक्सच्या जमान्यात आंतरदेशीय पत्र, पोस्टकार्ड कालबाहय़ झाले की काय, अशी शंका उपस्थित केली जाते. या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी २०११ मध्ये डाक विभागाने ‘मेरा टिकट’ हा उपक्रम हाती घेतला. या माध्यमातून प्रेक्षणीय स्थळे, महनीय व्यक्ती, ऐतिहासिक किल्ले, राष्ट्रपुरुष यांच्या नावे छापल्या जाणाऱ्या टपाल तिकिटांबरोबर आपले छायाचित्र असलेले टपाल तिकीट नागरिकांना उपलब्ध करण्याची व्यवस्था करण्यात आली. ग्राहकाने छायाचित्र टपाल कार्यालयात जमा करायचे आणि त्यासंबंधित ३०० रुपये शुल्क भरून टपाल तिकिटाच्या १२ प्रती घेऊन जायच्या किंवा आपण दिलेल्या पत्त्यावर त्या या विभागामार्फत पाठविल्या जातात. आपण स्वत: किंवा आपल्या लाडक्या व्यक्तीच्या आठवणी, त्याची विशिष्ट भावमुद्रा कायम लक्षात राहावी यासाठी या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे. हे तिकीट दैनंदिन कामकाजात वापरता येत असल्याने राज्यात या उपक्रमास पहिल्या टप्प्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मात्र कालांतराने त्यातील नावीन्य लोप पावल्याने ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरवल्याने राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये टपाल कार्यालयात ही योजना रडतखडत सुरू आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन किंवा विशेष काही महोत्सव असेल तर त्या ठिकाणी या उपक्रमाची प्रसिद्धी केली जाते. सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांची गर्दी लोटली असताना टपाल विभागाकडे कोणी या विशेष सेवेची विचारणा न केल्यामुळे हा उपक्रम सिंहस्थ काळात केवळ नाशिक विभागापुरता मर्यादित राहिला. मात्र सध्या बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे भगवान ऋषभदेव यांचा महामस्ताभिषेक सोहळा सुरू असून त्या ठिकाणी टपाल विभागाने टपाल तिकीट आणि मेरा टिकटचे आयोजन केले आहे.
टपाल विभागाच्या कक्षेत जागेवर टपाल तिकीट उपलब्ध केले जातात. सहा दिवसांत या ठिकाणी केवळ ८० भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला. गुरुवापर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार असून नंतर मालेगाव, नाशिक येथील मुख्य कार्यालयात ग्राहकांना त्याचा लाभ घेता येईल, असे मालेगाव विभागाचे अधीक्षक एल. व्ही. सूर्यवंशी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा