नाशिक – नाशिक ते पुणे महामार्गावरील सिन्नर बाह्य वळण रस्त्यावरील खड्डे अपघातांना नियंत्रण देत आहेत. या मार्गावरील गुरेवाडी चौफुलीवर खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात घडत आहेत. सोमवारी याच ठिकाणी भरधाव खासगी बसने मोटारीला दिलेल्या धडकेत महिला वैद्यकीय अधिकारी जखमी झाली. या चौफुलीपासून काही अंतरावरून शिर्डी आणि पुण्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाची सुरुवात होते. तत्पूर्वीच रस्त्याची बिकट अवस्था असताना टोल कंपनीने त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याची तक्रार वाहनधारकांकडून होत आहे.
हेही वाचा >>> मुख्यमंत्रीपदाचा पेच असताना एकनाथ शिंदे यांच्या पत्नीची त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा
सिन्नर बाह्य वळण रस्त्यावरील खड्डेमय गुरेवाडी चौफुली धोकादायक झाल्याकडे स्थानिक वाहनधारकासह वाहतूक पोलिसांकडून वारंवार लक्ष वेधले जाते. मात्र, खड्डे दुरुस्तीकडे टोल कंपनीने डोळेझाक केली आहे. सोमवारी याच चौफुलीजवळ झालेल्या अपघातात दोडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याणी वासनिक जखमी झाल्या. नाशिक येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. वासनिक दररोज दोडीला आपल्या मोटारीतून प्रवास करतात. सकाळी त्या नेहमीप्रमाणे नाशिक-पुणे महामार्गावरून दोडीकडे निघाल्या होत्या. सिन्नर बाह्य वळण रस्त्यावरील गुरेवाडी चौफुलीजवळ खड्ड्यांमुळे वाहनाचा वेग कमी केला असता मागून भरधाव आलेल्या खासगी आराम बसने त्यांच्या मोटारीला धडक दिली. अपघातात त्या जखमी झाल्या. वाहनाचे मोठे नुकसान झाले. वाहतूक पोलिसांनी धाव घेतली.
हेही वाचा >>> नाशिक : दिवसा घरफोडी करणारा जाळ्यात, १७ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत
धडक देणारी खासगी प्रवासी बस गुजरातची होती. संबंधित चालकाकडून अरेरावीची भाषा करण्यात आली. याबाबत डॉ. वासनिक यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सिन्नर बाह्य मार्गावरील ही चौफुली खड्ड्यांमुळे अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे. येथून शिर्डी व पुण्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाकडे मार्ग जातो. उड्डाणपुलाखालून जाणारे मार्ग आहेत. तत्पूर्वीच खड्ड्यांमुळे वाहनांची गती कमी केल्यास मागून भरधाव येणारी वाहने धडकतात. असे अपघात या चौफुलीवर वारंवार घडत असल्याचे वाहतूक पोलीसही मान्य करतात. संबंधितांनी रस्ता दुरुस्तीबाबत वारंवार टोल कंपनीकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, कंपनीकडून दुर्लक्ष झाल्यामुळे अपघातांचे सत्र कायम आहे. अपघात टाळण्यासाठी चौफुलीवर तैनात वाहतूक पोलीस अनेकदा आसपासची माती, खडी खड्ड्यात टाकतात. परंतु, ती तात्पुरती मलमपट्टी ठरते. स्थानिक चारचाकी मोटारींकडून या मार्गावर एका बाजूचा ४० रुपये टोल आकारला जातो. बाहेरील वाहनांकडून ही आकारणी अधिक आहे. दररोज हजारो मोटारींकडून टोल वसुली करणाऱ्या कंपनीने अपघातांना निमंत्रण देणाऱ्या खड्ड्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याची संतप्त प्रतिक्रिया वाहनधारकांमधून उमटत आहे.