वीज पुरवठा खंडित झाल्याचा परिणाम

नाशिक : वीज पुरवठय़ात अकस्मात उद्भवलेल्या तांत्रिक दोषामुळे गुरुवारी सकाळी अडीच तास गंगापूर धरणातून पाणी उचलता आले नाही. परिणामी, शहरातील सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. सिडको, सातपूरसह काही भागात अडचणी आल्या, तर काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. सायंकाळी अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याच्या तक्रारी आहेत.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका गंगापूर धरणातून पाणी घेते. या केंद्राला वीज पुरवठा करणारी वाहिनी तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला.

त्यातच गंगापूर धरणालगतच्या महावितरणच्या वीज खांबावर तसाच तांत्रिक दोष उद्भवला. वीज पुरवठा बंद झाल्याने पालिकेला सकाळी सात ते साडेनऊ हे अडीच तास गंगापूर धरणातून पाणी घेता आले नाही. त्याची झळ शहरवासीयांना बसली.

पाणीपुरवठा विस्कळीत झाला. सिडको, सातपूरमधील काही भागात एक वेळ, तर उर्वरित भागात दोनवेळा पाणी पुरवठा होतो. जिथे एकदाच पाणीपुरवठा होतो, तेथील नागरिकांना या समस्येचा अधिक फटका बसला. काही दिवसांपासून पंचवटी विभागातंर्गत जलवाहिन्या दुरुस्तीची कामे सुरू होती. यामुळे काही भागात एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. त्याची पूर्वकल्पना पालिकेने दिली असल्याने नागरिकांनी पाण्याचा साठा करण्याची दक्षता घेतली होती.

गुरुवारी मात्र अकस्मात कोसळलेल्या संकटाने अनेकांना टंचाईला तोंड द्यावे लागले. संपूर्ण शहराच्या पाणी पुरवठय़ावर परिणाम झाल्यामुळे महावितरणने वाहिन्यांवरील दोष तात्काळ दूर करण्यास प्राधान्य दिले.

कार्बन नाका येथील वाहिनी आणि धरण परिसरातील वीज खांबावरील दुरुस्तीचे काम अडीच तासात करीत वीज पुरवठा पुर्ववत झाला. नंतर पाणी उचलण्याचे काम सुरू झाले. परंतु, तोवर बराच उशीर झाला होता. मुळात धरणातून उचललेले पाणी शुध्दीकरणासाठी केंद्रावर जाते. नंतर ते वेगवेगळ्या जलकुंभावरून वितरित केले जाते.

पाण्याचा हा प्रवास काही तासांचा असतो. सकाळी अडीच तास खंड पडल्याने सर्व व्यवस्था विस्कळीत झाली. काही भागात सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. या संदर्भात तक्रारी आल्या नसल्याचे पालिकेने म्हटले आहे.

अनेक भागात दोन वेळा पाणीपुरवठा होतो. तिथे फारशा तक्रारी नसतात. सिडको, सातपूर या एकवेळ पाणीपुरवठा होणाऱ्या भागात अधिक झळ बसते हे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले.

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सकाळी अडीच तास गंगापूर धरणातून पाणी उचलण्याचे काम बंद होते. यामुळे शहरातील सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला.

– पाणीपुरवठा विभाग, महापालिका

Story img Loader