स्वस्तातील वीज खरेदीला प्राधान्य

वीज कंपनीच्या संचालकांनी मांडलेल्या स्थितीमुळे एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे भवितव्य दोलायमान झाल्याचे अधोरेखित झाले आहे. एकलहरे केंद्राचे स्थलांतर होणार नाही, तसेच विजेची मागणी न वाढल्यास क्षमतेतही वाढ होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

वीज खरेदी पद्धतीत बदल करून ‘महावितरण’च्यावतीने आता ज्या कंपनीकडून स्वस्तात वीज उपलब्ध होते, तिथून ती आपोआप खरेदी केली जाते. या स्पर्धेत जे टिकणार नाहीत, ती केंद्रे बंद होतील. जेव्हा राज्यात विजेची मागणी वाढेल, तेव्हा एकलहरेसह इतरही वीजनिर्मिती केंद्रातून वीज घेतली जाईल. पण, जेव्हा मागणी नसेल तेव्हा स्वस्तातील वीज खरेदी हाच मार्ग अनुसरला जाईल. वीजनिर्मितीसाठी चंद्रपूरचा कोळसा नाशिक येथे आणणे वाहतुकीच्या दृष्टीने परवडणारे नाही, असा लेखाजोखा मांडण्यात आला आहे.

ऊर्जा विभाग आणि ‘महावितरण’ने मागील चार वर्षांत नाशिकसह राज्यात केलेल्या विकासकामांच्या ‘प्रगतीची चार वर्षे’ या पुस्तिकेचे प्रकाशन सोमवारी महाराष्ट्र वीज मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक, ‘महावितरण’च्या कोकण प्रादेशिक विभागाचे संचालक श्रीकांत जलतारे, आर्थिक विकास मंडळाचे (लघू आणि उद्योग) अध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना पाठक यांनी एकलहरे वीजनिर्मिती केंद्र स्थलांतरीत होणार नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, ज्या केंद्रांचा वीजनिर्मितीचा खर्च अधिक आहे, त्यांची वीज खरेदी होणे अवघड असल्याचे सूचित केले.

वीज खरेदीत विशिष्ट प्रणाली कार्यान्वित झाली आहे. ज्यांच्याकडून स्वस्तात वीज उपलब्ध होईल, त्यांच्याकडून ती खरेदी करण्याचे धोरण आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे खासगी कंपन्यांच्या वीजनिर्मितीचा खर्च कमी आहे. ते सरकारी वीजनिर्मितीच्या तुलनेत कमी दराने वीज देतात. या स्पर्धेत एकलहरेसह अन्य वीजनिर्मिती केंद्र कितपत निभाव धरणार?  यावर त्यांनी भुसावळच्या वीजनिर्मिती केंद्राचा दाखला देऊन ते खासगी वीज कंपनीशी चांगली स्पर्धा करत असल्याकडे लक्ष वेधले. चंद्रपूरहून कोळसा एकलहरे येथे आणायचा म्हटला तर वाहतूक खर्च वाढतो. परदेशातील आयात कोळशावर वीजनिर्मिती करावयाची झाल्यास एकलहरेला प्राधान्य दिले जाईल. राज्यात विजेची मागणी वाढली तर एकलहरे केंद्राची क्षमतावाढ होईल. भुसावळ प्रकल्पात ६६० मेगावॉटचे तीन संच अस्तित्वात असून प्रत्येकी ६६० मेगावॉटच्या दोन संचांचे काम प्रगतिपथावर आहे. राज्यात विजेची मागणी वाढल्यास एकलहरेसह अन्य प्रकल्पातून विजेची खरेदी केली जाईल. मागणी ओसरल्यास स्वस्तातील विजेचा पर्याय कायम राहणार असल्याचे पाठक यांनी सांगितले.

प्रकल्पाला घरघर

एकलहरेचा विचार करता सद्य:स्थितीत प्रत्येकी २२० मेगावॉट क्षमतेचे पाचपैकी केवळ दोन संच कार्यान्वित असून तीन संच बंद आहेत. कार्यरत एका संचाची मुदतही पुढील दोन-तीन वर्षांत संपुष्टात येत आहे. वीज कंपनीला खासगी कंपनीसह नॅशनल ग्रीडमधून स्वस्तातून वीज मिळते. राज्याने काही वर्षांपूर्वीच अनेक कंपन्यांशी ३० हजार मेगावॉट वीज खरेदीचे करार केलेले आहेत. या स्थितीत एकलहरे वीज केंद्रांचे भवितव्य अधांतरी बनल्याचे दिसत आहे.

सौर ऊर्जेचा पर्याय

ज्या वीजनिर्मिती केंद्रांकडे मोकळी जागा उपलब्ध आहे, तिथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. एकलहरे औष्णिक केंद्राकडे मोठय़ा प्रमाणात जागा आहे. त्या अनुषंगाने विचार होईल की नाही, हा प्रश्न  अनुत्तरीत आहे.

Story img Loader