लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : मुंबईतील विजेची गरज भागवण्यासाठी ऐन पावसाळ्यात नाशिककरांना सोमवारी अकस्मात १० ते १२ तास भारनियमन सोसावे लागले. रात्रीपासून स्थानिक पातळीवरील भारनियमन अहमदनगरकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगितले गेले असतानाही मंगळवारी दुपारी नाशिकच्या अनेक वीज गायब झाली होती. हा भारनियमनाचा भाग नसल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला.

मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीचा एक संच सोमवारी बंद पडल्याने संपूर्ण ग्रीड सतर्क होता. नाशिकला एकलहरे आणि बाभळेश्वर केंद्रातून वीज पुरवठा होतो. एकलहरे औष्णिक वीज केंद्रात तीनपैकी केवळ दोन संचावर सध्या वीज निर्मिती होत आहे. यातून ४२० मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित असते. मात्र, जुनाट संचांमुळे तितकी वीज निर्मिती होत नाही. अतिरिक्त वीज बाभळेश्वरहून नाशिकला पुरवली जाते. याच ठिकाणी मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या चार वाहिन्या आहेत. सोमवारी नाशिकची १४०० मेगावॉटची सर्वोच्च मागणी होती. मुंबईत विजेचा तुटवडा भासल्याने साधारणत: २०० मेगावॉट वीज तिकडे वळवली गेल्याने स्थानिक पातळीवर भारनियमन करणे भाग पडल्याचे महापारेषणचे वरिष्ठ अधिकारी सांगतात. या दिवशी शहर व ग्रामीण भागात टप्प्याटप्प्याने भारनियमन करावे लागले. साधारणत: १२ तास नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. यादिवशी काही भागात वादळी पाऊस झाला. त्यामुळे अडचणीत भर पडली.

आणखी वाचा-नाशिक : रेल्वेत सापडलेल्या बालिकेची ओळख पटविण्याचे आव्हान

रात्री नाशिकला करावे लागणारे भारनियमन अहमदनगरकडे वर्ग करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, मंगळवारी परिस्थितीत सुधारणा झालेली नव्हती. सकाळी शहरात वीज पुरवठा सुरळीत होता. दुपारी एक वाजता गंगापूर रोडसह काही भागातील वीज पुन्हा गायब झाली. अनेकांनी त्याचा संबंध भारनियमनाशी जोडला. मात्र मंगळवारी शहरात कुठेही भारनियमन करावे लागले नसल्याचे महावितरणक़डून स्पष्ट करण्यात आले. तांत्रिक दोषामुळे एखाद्या भागातील वीज पुरवठा काही काळ खंडित होऊ शकतो, असे वीज कंपनीकडून सांगण्यात आले.