नाशिक – कमी पर्जंन्यमानामुळे यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नाही. दुष्काळाच्या सावटात जे पाणी शिल्लक आहे, त्याचा अतिशय काटेकोरपणे वापर करावा लागणार आहे. त्याचाच भाग म्हणून दारणा आणि पालखेड धरणातून पिण्यासह सिंचनासाठी सोडलेल्या आवर्तनावेळी वेगवेगळ्या कालव्यांवरील वीज पुरवठा दररोज २१ ते २२ तास खंडित केला जाणार आहे. संबंधित गावांना दिवसभरात केवळ दोन ते तीन तास वीज उपलब्ध राहणार असून रात्रीही अंधारात राहण्याची वेळ येणार आहे.
पावसाअभावी यंदा दुष्काळाचे सावट गडद होणार आहे. धरणातून विसर्ग करताना पाणी चोरी रोखण्यासाठी अनेकदा वीज पुरवठा बंद ठेवण्याचा मार्ग अवलंबला जातो. जायकवाडीला पाणी सोडताना ती कार्यपद्धती अवलंबली गेली होती. त्याची पुनरावृत्ती आगामी काळात होणार आहे. पालखेड धरणातून डाव्या कालव्यावरील गावांना सिंचनासाठी ९९९ दशलक्ष घनफूट आणि पाणी पुरवठा योजनांसाठी एक हजार दशलक्ष घनफूट असे एकूण १९९९ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येत आहे. २१ जानेवारीपर्यंत आवर्तन कालावधी आहे. तोपर्यंत कालव्यावरील गावांमध्ये आवर्तन कालावधीत दररोज २१ तास वीज पुरवठा खंडित करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत. या गावांमध्ये सकाळी सात ते दहा या कालावधीत वीज पुरवठा होऊ शकणार आहे. या निर्णयाची अमलबजावणी दिंडोरी तालुक्यातील मौजे जोपुळे, लोखंडेवाडी, चिंचखेडसह काही गावे, निफाड तालुक्यातील उंबरखेड, पिंपळगाव, आहेरगाव, लोणवाडीसह एकूण ४२ गावे, येवला तालुक्यातील मौजे मानोरी, देशमाने, मुखेड, सोमठाणेसह २७ गावांत होणार आहे.
हेही वाचा – जळगाव मनपा तिजोरीत ऑनलाइन करभरणामुळे तीन वर्षांत ३९ कोटी जमा, आता क्यूआर कोड लावणार
नाशिक पाटबंधारे विभागाकडून दारणा धरणातून गोदावरी उजवा व डावा तट कालव्यावरील तसेच दारणा, गोदावरी नदीवरील गावांसाठी सिंचनासाठी प्रत्येकी १८५० दशलक्ष घनफूट आवर्तन सोडण्यात आले आहे. १३ जानेवारीपर्यंत हे आवर्तन सुरू राहणार आहे. आवर्तन काळात वरील कालव्यावरील गावांतही दररोज २२ तास वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या गावांना सकाळी सहा ते आठ या कालावधीत म्हणजे केवळ दोन तास वीज पुरवठा होऊ शकणार आहे. उपरोक्त दोन्ही कालव्यांवर निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे, तामसवाडी, ब्राम्हणवाडा, तारुलखेडले अशा एकूण २० गावांतील कालव्यालगतचे रोहित्र बंद केले जातील. सिन्नर तालुक्यातील मौजे चोंडी, मेंढी, सांगवीसह १४ गावांत तोच मार्ग अवलंबला जाणार आहे. येवला तालुक्यातील मौजे महालखेडा, निमगाव, मठ, मुखेड, सत्यगाव आदी ठिकाणी कालव्यावरील रोहित्र बंद केले जातील.
आवर्तन काळात उपरोक्त गावांतील वीज पुरवठा बंद करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आवर्तनातील सिंचन व पिण्याचे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पाटबंधारे विभागाची आहे. आवर्तनासाठी नमूद केल्यानुसार पाणी सोडावे. जास्तीचे पाणी सोडू नये. – जलज शर्मा, (जिल्हाधिकारी, नाशिक)