नंदुरबार : कोट्यावधींचा अर्थसंकल्प असलेल्या आदिवासी विकास विभागाकडे आश्रमशाळांचे वीज देयक भरण्यासाठी तीन ते चार महिन्यांपासून अनुदान नसल्याने आश्रमशाळांना अंधारात राहण्याची नामुष्की ओढावली आहे. नंदुरबार प्रकल्पातंर्गत ठाणेपाडा आश्रमशाळेचे चार महिन्यांचे वीज देयक न भरल्याने शुक्रवारी आश्रमशाळेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. रात्री कोणते संकट उभे ठाकेल, याची जाणीव झाल्यानंतर तातडीने कार्यवाही करुन थकबाकी भरल्यानंतर वीज पुरवठा नियमित करण्यात आला.
ऐन परीक्षांचे सत्र सुरु असताना नंदुरबार एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्पातंर्गत येणाऱ्या ठाणेपाडा शासकीय आश्रमशाळेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. या शाळेचे चार महिन्यांचे सुमारे ६६ हजार रुपये वीज देयक थकीत आहे. आदिवासी विकास विभागाकडे वीज देयकांसाठी अनुदानच नसल्याचे उघड झाल्यानंतर कंपनीने शुक्रवारी आश्रमशाळेचा वीज पुरवठा खंडित केला. दै. लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी आश्रमशाळेला भेट दिल्यानंतर विभागाची यंत्रणा कामाला लागली. वाघाळे येथील शासकीय आश्रमशाळेतून एक लाखाचा निधी ठाणेपाडा आश्रमशाळेने उसनवारी तत्वावर घेतला. दुसरीकडे, नंदुरबार एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्पाने देखील शालेय व्यवस्थापन समितीला तातडीने एक लाखाचा निधी दिला. त्यानंतर चार तासांनी वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला. हीच तत्परता दोन्ही विभागांनी आधी का दाखवली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या आश्रमशाळेत सुमारे सव्वातीनशे विद्यार्थी हे निवासी आहेत. विजेअभावी या विद्यार्थ्यांना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागू शकते, हेही शासकीय यंत्रणांनी लक्षात न घेतल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली.
ठाणेपाडा आश्रमशाळेच्या वीज देयकासाठी अनुदान नसल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. याबाबत संबंधीत कनिष्ठ अभियंताना विनंतीही करण्यात आली होती. परीक्षा सुरु असल्याने वीज पुरवठा खंडित करु नये, असे सांगण्यात आले होते. परंतु, कुठलाही विचार न करता त्यांनी वीज पुरवठा खंडित केला. आम्ही शालेय व्यवस्थापन समितीला एक लाख रुपयांचा निधी दिला असून त्यातून तातडीने वीज वितरणचे देयक अदा करण्यात आल्यावर वीज पूर्ववत करण्यात आली आहे. चंद्रकांत पवार ( प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार)