नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे शेकडो वर्षांपासून ग्रामदेवता महादेवीच्या नावाने गाव जेवणाची परंपरा आहे. लोकवर्गणीतून जमा झालेल्या शिद्यातून विशिष्ट जातीतील व्यक्तींसाठी वेगळा स्वयंपाक करण्याची आणि त्यांची वेगळी पंगत बसविण्याची परंपरा महाराष्ट्र अंनिसच्या पाठपुराव्याने बंद झाली आहे. कूप्रथेविरोधातील लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.
त्र्यंबकेश्वरमधील महादेवी ट्रस्टकडून लोक वर्गणी जमा करुन गाव जेवणाचे आयोजन केले जाते. त्याला प्रयोजन म्हणतात. त्यामध्ये १० हजाराहून अधिक लोक जेवण करतात. परंतु, गावातील एका विशिष्ट समाजाच्या भोजनासाठी लागणारे अन्न लोकवर्गणीतून जमा झालेल्या रकमेतूनच खरेदी केलेल्या शिद्यातून वेगळे शिजवले जाते. या विशिष्ट समाजाची भोजनाची पंगत इतर बहुजन समाज बांधवांपासून वेगळी बसविण्याची पद्धत होती. दोन वर्षांपूर्वी अंनिसच्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन पंगत भेदाची कूप्रथा थांबवली होती.
यावर्षी गरुवारी गाव जेवणाचे निश्चित झाल्यावर जातीनिहाय वेगवेगळ्या पंगती बसविण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली. लोकांच्या इच्छेने गाव जेवण होत असेल तर विरोध न करता सर्व गावकऱ्यांनी एकाच ठिकाणी शिजवलेल्या आणि एकाच पंगतीत वाटप होत असलेल्या अन्नाचा लाभ घ्यावा, अशी भूमिका अंनिसने घेतली. तसे निवेदन त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदारांना काही दिवस अगोदरच दिले होते. त्यांच्याशी पंगतीभेदाबाबत सविस्तर चर्चाही केली. गावजेवणात एका विशिष्ट समाजासाठी वेगळ्या ठिकाणी अन्न शिजविणे आणि त्यांची वेगळी पंगत बसविणे, हे अनिष्ट, अमानवीय आणि राज्य घटनेशी विसंगत असून, सामाजिक विषमतेला बळ देणारे आहे, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना तोंडी तसेच निवेदनातून अंनिसचे राज्य प्रधान सचिव डाॅ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, त्र्यंबकेश्वरचे कार्याध्यक्ष संजय हरळे, दिलीप काळे यांनी पटवून दिले. त्यानंतर तहसीलदारांनी संबंधित विश्वस्तांना कायदेशीर समज दिली.
पोलीस प्रमुखांनीही अंनिसच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्यानंतर विश्वस्तांनीही सर्वांना एकाच पंगतीत भोजन देण्याचे ठरविले. त्यामुळे वर्षानुवर्षं चालत आलेली विशिष्ट समाजाची वेगळी पंगत बसविण्याची प्रथा संपुष्टात आली. महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असला तरी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, महादेवी ट्रस्ट ,गावकरी यांनी मोठे धाडस दाखवल्याचे अंनिसने नमूद केले.
ही कूप्रथा दोन वर्षांपूर्वी थांबविण्यात आली होती. परंतु, यावर्षी वेगवेगळ्या पंगती बसणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने अंनिसच्या जिल्हा व राज्य कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही याविरोधात लढा दिला. त्यातून हे सामाजिक परिवर्तन झाले. -संजय हराळे (कार्याध्यक्ष, अंनिस, त्र्यंबकेश्वर)
© The Indian Express (P) Ltd