प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नांदगाव, मालेगाव, कळवण, बागलाण आणि येवला तालुक्यात लक्ष्यांकानुसार कामे झालेली नसल्याची बाब पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उघड झाली. त्यामुळे विशेष अभियान राबवून दिलेल्या लक्ष्यांकानुसार उर्वरित घरकुलांची कामे मार्चअखेरपर्यंत पूर्णत्वास न्यावी, अशी तंबी भुसे यांनी दिली. जिल्ह्यात विविध घरकुल योजनांतर्गत प्राप्त प्रस्तावांमधील आवश्यक बाबींची पूर्तता करून प्रलंबित घरकुलांची कामे जलद पूर्ण करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.
हेही वाचा >>> नाशिक: गायक सुरेश वाडकर यांच्या भूखंड प्रकरणात २० कोटींच्या खंडणीची मागणी – स्वीय सहायकास धमकी
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे घरकुल योजनांचा आढावा बैठक झाली. यावेळी भुसे यांनी मोदी आवास घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, आदिम जमाती आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना या घरकुल योजनांसह पीएम जनमन योजनेचाही आढावा घेतला. प्रधानमंत्री आवास योजनेत नांदगाव, मालेगाव, कळवण, बागलाण आणि येवला तालुक्यात निर्धारित लक्ष्यांकानुसार कामे झालेली नाहीत. त्यामुळे या भागात विशेष अभियान राबवावे. दिलेल्या लक्ष्यांकानुसार उर्वरित राहिलेली घरकुलांच्या कामांसाठी अधिकारी स्तरावर जबाबदारी निश्चित करावी आणि मार्च पर्यंत कामे पूर्ण करावीत असे त्यांनी सूचित केले. अधिकच्या घरकुलांसाठीचे नवीन प्रस्तावही त्वरेने सादर करून मंजूर करून घेण्याच्या सूचना त्यांनी केली.
हेही वाचा >>> उमेदवारांपेक्षा महाजन-खडसे यांच्यातच मुख्य लढत
विविध घरकुल योजनांचे प्राप्त उद्दीष्टे, पूर्ण झालेली घरकुले, प्रगतीपथावर असलेली घरकुले व अपूर्ण घरकुले यांची तालुकानिहाय माहिती घेतली गेली. उपस्थित लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्याचे आदेशही दिले. बैठकीस आमदार माणिकराव कोकाटे, सीमा हिरे, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, अपर जिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांच्यासह तालुक्यांतील गटविकास अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.
लाभार्थ्यांचे सर्वेक्षण शबरी घरकुल योजनेसाठी शासन स्तरावर अधिकचा लक्ष्यांक मिळणार आहे. त्यादृष्टीने सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यांतील घरकुलांचे प्राप्त घरकुलांचे प्रस्ताव नाशिक व कळवण प्रकल्प अधिकारी यांना सादर करून यातून जे प्रस्ताव प्रात्र ठरतील ते तातडीने मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना सादर करावेत. रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलांसाठी ग्रामपातळीवर पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करावे व प्रत्येक गावातील ग्रामसेवक यांच्याकडून पात्र लाभार्थ्यांचा दाखला प्राप्त करून पुढील बैठकीत सादर करावी, असे सांगण्यात आले.