धुळे – महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचे काम करताना पंतप्रधान जनआरोग्य योजनेचेही अतिरिक्त काम विना वेतन करावे लागत असल्याने पुरेशा वेतनासाठी आरोग्य मित्रांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला आहे. आरोग्य मित्रांच्या संपाला पाच दिवस होऊनही संबंधित कंपनीने दखल न घेतल्याने दोघांनी बुधवारपासून अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलकांच्या जीवास धोका निर्माण झाल्यास प्रशासन आणि संबंधित कंपनी जबाबदार राहील, असा इशारा यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात एमडी इंडिया इन्शुरन्स प्रा.लि. च्या माध्यमातून महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचे काम २०१२ पासून सुरू आहे. या योजनेचे काम आरोग्य मित्रांतर्फे करण्यात येत आहे. यानंतर पंतप्रधान जनआरोग्य योजनेचे अतिरिक्त काम आरोग्य मित्रांकडून करून घेण्यात येत आहे. पंतप्रधान जनआरोग्य योजनेचे काम विनावेतन केले जात असल्याचे आरोग्य मित्रांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने २५ हजार रुपये मासिक वेतन द्यावे, अशी मागणी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हा प्रमुखांकडे करण्यात आली आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात असला तरी पगारवाढीची कुठलीही लेखी हमी संंबंधित कंपनीने दिलेली नाही. यामुळे आठ डिसेंबरपासून आरोग्य मित्रांनी काम बंद केले आहे.

हेही वाचा – अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

हेही वाचा – अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर महामार्ग चौपदरीकरण वादात, रावेर, यावल, फैजपूर, सावद्याला वगळल्यामुळे विरोध

संपाला पाच दिवस होऊनही शासनाने किंवा संबंधित कंपनीने दखल घेतलेली नाही. त्यामुळे आरोग्यमित्र गणेश शिंदे आणि रवींद्र थोरात या दोघांनी प्रतिनिधीक स्वरुपात अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pradhan mantri jan arogya yojana without pay load on arogya mitra in dhule decision to give up food for wages ssb
Show comments