नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीत प्रगती आणि परिवर्तन पॅनलमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. कार्यकारी मंडळ आणि तालुका प्रतिनिधींच्या काही जागांवर पहिल्या फेरीत प्रगती पॅनलचे बरेचसे उमेदवार कमी-अधिक फरकाने आघाडीवर असले तरी सभापतीपदासह तालुका सदस्यांच्या पाच ते सहा जागांवर परिवर्तनचे उमेदवार पुढे आहेत. काही जागांवर दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना जवळपास समान मते असल्याने कमालीची चुरस बघता पुढील फेऱ्यांमध्ये काय घडेल, याची उत्कंठा ताणली गेली आहे.
मराठा समाजाच्या या संस्थेच्या कार्यकारी मंडळ आणि तालुका प्रतिनिधींच्या २१ आणि सेवक पदाच्या तीन अशा एकूण २४ जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. सोमवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. सरचिटणीस, उपाध्यक्षपदासह इगतपुरी, नाशिक शहर, सिन्नर, देवळा या तालुका सदस्यांच्या जागेसाठी तिरंगी तर उपसभापतीपदासाठी चौरंगी आणि उर्वरित जागांवर थेट लढत असल्याने सभासद कोणाला कौल देतात, याकडे सर्वाचे लक्ष होते. मतदानाची टक्केवारी वाढून ९५ टक्क्यांपर्यंत गेल्याने निकालाबाबत वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त झाले. नीलिमा पवार आणि माणिकराव बोरस्ते यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ प्रगती विरुद्ध अॅड. नितीन ठाकरे आणि आ. माणिक कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन या पारंपरिक पॅनलमध्ये झालेल्या लढतीचे अंदाज वर्तविणे अवघड झाले.
१४ मतदान केंद्रांवरील मतपेटय़ांमधून मतपत्रिकांचे विभाजन, गठ्ठे करणे यात बराच वेळ गेला. प्रत्यक्षात मतमोजणी सायंकाळी सुरू झाली. २१ जागांसाठी एक हजार मतांच्या प्रत्येकी दहा फेऱ्या पार पडणार आहेत. सायंकाळी पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाला. संस्थेतील सर्वात प्रभावशाली मानल्या जाणाऱ्या सरचिटणीसपदाच्या जागेसाठी प्रगतीच्या नीलिमा पवार यांनी ५०२ मते मिळवून विरोधी परिवर्तनच्या अॅड. नितीन ठाकरे यांच्यावर १५ मतांनी आघाडी घेतली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रगतीचे डॉ. सुनील ढिकले यांनी (५९९) परिवर्तनचे उमेदवार आमदार माणिक कोकाटे (३९९) यांच्यावर मोठी आघाडी मिळवली. सभापतीपदाच्या निवडणुकीत परिवर्तनच्या बाळासाहेब क्षीरसागर (५०९) मते घेत प्रतिस्पर्धी प्रगतीचे माणिकराव बोरस्ते (४७६) यांच्यावर आघाडी घेतली. उपसभापतीपदासाठी डॉ. वि. बच्छाव (५१८) तर डी. बी. मोगल (४४२), चिटणीसपदासाठी डॉ. प्रशांत पाटील (५२७) तर दिलीप दळवी (४७६) अशी मते मिळाली. तालुका सदस्यांच्या जागेसाठी तेवढीच चुरस होती.
नाशिक शहर गटात नाना महाले, कळवणमधून धनंजय पवार, मालेगावमधून जयंत पवार अशा प्रगतीच्या काही उमेदवारांनी अल्पशी का होईना आघाडी मिळवली. तर परिवर्तनचे चांदवडमधून डॉ. सयाजी गायकवाड, सिन्नरमधून कृष्णा भगत, येवल्यातून नंदकुमार बनकर यांनी आघाडी घेतली. इगतपुरी, नांदगाव, बागलाण, देवळा आदी तालुक्यात दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना एक तर समान मते किंवा एक-दोन मतांचा फरक आहे. आणखी नऊ फेऱ्यांची म्हणजे जवळपास नऊ हजार मत मोजणी बाकी आहे.
तिन्ही जागांवर सेवक पॅनल विजयी
शिक्षक सेवक पदाच्या तिन्ही जागांवर प्रगती पॅनलने पाठिंबा दिलेल्या सेवक पॅनलचे तिन्ही उमेदवार विजयी झाले. त्यांनी विरोधी परिवर्तन पॅनलने पाठिंबा दिलेल्या समर्थ पॅनलच्या उमेदवारांचा पराभव केला. शिक्षक सेवक पदाच्या मतमोजणीचे निकाल सर्वात आधी जाहीर झाले. कारण या पदांसाठी सेवक सभासदांची संख्या ४६३ इतकी होती. त्यामुळे मतमोजणी लवकर झाली. या पदांवर सेवक पॅनलचे डॉ. एस. के. शिंदे, चंद्रजित शिंदे आणि जनार्दन निंबाळकर हे विजयी झाले.