जळगाव – खड्डेमय रस्ते, सर्वत्र असलेली अस्वच्छता, अमृत योजनेची अपूर्णावस्थेतील कामे यांसह सध्या महापालिकेतील राजकीय खेळाचा निषेध करीत महापालिकेत तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष आयुक्तांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सोमवारपासून स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे.
हेही वाचा >>> जळगाव आयुक्तांना सामाजिक संघटनांचे पाठबळ – अविश्वास ठराव मागे घेण्याची मागणी
वर्षानुवर्षांपासून जळगावकर समस्यांच्या विळख्यात आहेत. पाच-सहा वर्षांपासून जळगावकर रस्त्यांतील खड्ड्यांनी चांगलेच बेजार झाले आहेत. अनेकांना मणक्यांचे विकार जडले आहेत. रस्त्यांचे गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून परीक्षण करावे. शहर कचरायुक्त झाले आहे. सर्वत्र कचर्याचे ढीग दिसून येत आहेत. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे साफसफाई नियमित केली जात नाही. मात्र, महापालिका प्रशासनावर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून शहरातील साफसफाईचा मक्ता वॉटरग्रेस कंपनीला दिला असला, तरी शहरात सर्वत्र अस्वच्छता असल्याचे प्रहार जनशक्तीने म्हटले आहे. सध्या महापालिकेतील सत्तासंघर्षामुळे जळगावकर त्रस्त झाले आहेत. वर्षानुवर्षांपासून नगरसेवकांनी प्रभाग, वॉर्डातील समस्यांकडे कायम दुर्लक्ष केले आहे. महापालिका प्रशासनातील आयुक्तांकडूनही समस्यांबाबत दखल घेतलेली नाही. त्या समस्या सोडविण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करावी, या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबविली जात आहे. आगामी काळात मोहीम शहरातील प्रभाग, वॉर्डात राबविली जाणार असल्याचे पक्षाचे महानगराध्यक्ष प्रवीण पाटील यांनी सांगितले.