नाशिक – महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी पैसा कुठून आणला, आदिवासींच्या विकासासाठी असलेले सात हजार कोटी या योजनेसाठी वर्ग केले का, जर असे नसेल तर सरकारने आदिवासींसाठी असलेल्या निधीचे विवरण द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. नागपूर येथे एक सप्टेंबर रोजी नव्या आघाडीची घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

येथे पत्रकारांशी संवाद साधताना आंबेडकर यांनी, स्थानिक नेते निवडणुकीनंतर आदिवासी प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप केला. . नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासींच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. नागपूर येथील कार्यक्रमात सर्व आदिवासी नेत्यांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आदिवासींचे सर्व समूह एकत्र येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. छगन भुजबळ यांनी आमच्याबरोबर यावं त्यांना खुली ऑफर देत असल्याचे आंबेडकर यांनी दिले. छगन भुजबळ हेच शंभर टक्के ओबीसींचे नेते आहेत. पण त्यांच्या पक्षात ओबीसींवर बोलले जाते का, हे त्यांनी सांगावे. भुजबळ यांनी आमच्याबरोबर यावे, असा खुला प्रस्ताव असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. मनोज जरांगे यांनी सांगितल्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. विधानसभा निवडणुकीत आम्ही कोणाबरोबर जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>महिला सुरक्षेला प्राधान्य; जळगावमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून सहकार्याची ग्वाही

महायुती सरकार भ्रष्टाचाराचे माहेरघर

मालवण येथील राजकोट किनाऱ्यावर उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याविषयी हे सरकार भ्रष्टाचाराचे माहेरघर आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. रस्ते, उड्डाणपूल अशा कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे त्यांनी सांगितले.