नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जनजागृती आणि आंदोलनांच्या मार्गाने एकेकाळी शरद जोशी यांच्यासमवेत झंझावात निर्माण करणारे शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आणि निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड (९४) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. १९८० मध्ये शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली ऊस आणि कांदा प्रश्नांवर नाशिकमध्ये आंदोलन झाले होते. त्यात शेतकऱ्यांना उत्स्फुर्तपणे सहभागी करण्यात कराड यांचे महत्वाचे योगदान होते.

कराड हे काही दिवसांपासून येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. रविवारी दुपारी त्यांचे निधन झाले. राष्ट्र सेवा दलाच्या विचार प्रणालीने कार्यरत राहिलेल्या कराड यांनी अडीच दशके समाजवादी पक्षात काम केले. शेतीत नवनवीन प्रयोग केले. ऊस आणि कांद्याला अतिशय कमी भाव मिळत असल्याने त्याची कारणमिंमासा करण्यासाठी प्रल्हाद कराड, माधवराव मोरे यांनी शरद जोशी यांना निफाडमध्ये निमंत्रित केले.

हेही वाचा >>> त्र्यंबकेश्वर देवस्थानात पुरातत्व खात्यामुळे सुविधांना मर्यादा; नीलम गोऱ्हे यांचे मत

चर्चेतून सरकारी धोरणे ऊस दरात आडकाठी ठरल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी सर्वत्र जनजागृती केली. कांदा आणि उसाच्या प्रश्नावर शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली १९८० मध्ये तीव्र आंदोलन उभारले. त्यात मोठ्या संख्येने सहभागी झालेले शेतकरी हे त्यांच्या जनजागृतीचे फलीत ठरले. रेल्वे आणि रास्ता रोकोची दखल सरकारला घ्यावी लागली. या आंदोलनामुळे उसाचा प्रतिटन १५० रुपये भाव ३०० रुपयांवर गेला. शासनाला कांद्याची खरेदी करावी लागल्याचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सांगतात.

हेही वाचा >>> जळगाव : चांद्रयान-३ साठी हातेडच्या सुपुत्राची महत्त्वपूर्ण भूमिका; शास्त्रज्ञ संजय देसर्डा यांची द्रवरूप इंधनासाठी कामगिरी

पुढील काळात शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कराड यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. भारदस्त आवाजातील भाषणांमुळे शेतकरी संघटनेची बुलूंद तोफ अशी त्यांची ओळख झाली. निफाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. साखर कारखान्याचे खासगीकरण करण्याची मोहीम सुरू झाल्यानंतर गोदा-कादवा हा राज्यातील पहिला खासगी सहकारी साखर कारखाना उभारण्याचे श्रेय प्रल्हाद पाटील कराड यांच्याकडे जाते. निफाड येथील न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे ते संस्थापक विश्वस्त होते.

हेही वाचा >>> जळगाव : दुचाकी फिरविण्यास न मिळाल्याने चोरीचा मार्ग; अल्पवयीन दोघांची कबुली

सोमवारी निफाड तालुक्यातील जळगाव या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात सहा मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. कराड यांनी शेतकरी चळवळ व सहकाराच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला. त्यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक लोकप्रिय नेता काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

Story img Loader