राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही नाशिकची जबाबदारी सांभाळणारे खा. संजय राऊत यांच्यामुळे स्थानिक पातळीवर संघटना मजबूत राहिल्याचे चित्र होते. परंतु, आता महानगरपालिकेतील माजी नगरसेवकांमध्ये फाटाफूट सुरू झाली आहे. त्याच अंतर्गत शिंदे गटात सहभागी झालेले माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या महानगरप्रमुख पदी नियुक्ती करत सेनेच्या तटबंदीला धक्के देण्यास सुरूवात केली आहे. सेनेत अनेक नगरसेवक नाराज असून आगामी महानगरपालिका निवडणुकीपूर्वी तेही शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा तिदमे यांनी केला आहे.
शिवसनेच्या माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्याकडे मागील काही वर्षांपासून नाशिकची जबाबदारी आहे. सेनेत फूट पडल्यानंतर प्रथम नांदगावचे आमदार सुहास कांदे आणि नंतर तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे हे शिंदे गटात सहभागी झाले होते. कालांतराने नाशिकचे खा. हेमंत गोडसे यांनीही शिंदे गटात सहभागी होणे पसंत केले. खासदार-आमदार पक्षांतर करीत असताना स्थानिक पातळीवर संघटना मजबूत असल्याचे दावे खासदार राऊत आणि सेना नेत्यांकडून केले जात होते. महापालिकेतील एकही माजी नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार नसल्याचे सांगितले गेले. मध्यंतरी अनेक माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन आपली निष्ठा त्यांच्याप्रती व्यक्त केली होती. परंतु, शिवसेना मजबूत असल्याचे दावे फोल ठरले असून माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्यास सुरूवात झाली आहे.
हेही वाचा- नाशिक : प्रकल्प पळवापळवीतून मुंबई, महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव; छगन भुजबळ यांचा आरोप
आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीचा विचार
तिदमे हे महापालिकेतील शिवसेनाप्रणित कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत. शिंदे गटाची स्थापना झाल्यानंतर आपली चर्चा झाली होती. या गटाकडून स्थानिक पातळीवर प्रवेश आता सुरू झाले आहेत. स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या (शिंदे गट) संघटना बांधणीवर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे तिदमे यांनी सांगितले. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीचा विचार आहे. आपल्यासह अनेक सेना नगरसेवकांना ते मान्य नव्हते. शिवसेनेतील बहुतांश नगरसेवक नाराज आहेत. तेही लवकरच शिंदे गटात दाखल होतील, असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा- “ठाकरे सेनेचा दसरा मेळावा शरद पवार आणि सोनिया गांधींच्या विचारांचा…” गुलाबराव पाटलांची टीका
शिंदे गटाच्या चालीने शिवसेनेत अस्वस्थता
मावळत्या महानगरपालिकेत शिवसेनेचे ३३ माजी नगरसेवक होते. आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने फासे टाकण्यास सुरूवात केल्याने शिवसेनेच्या वर्तुळात अस्वस्थता पसरली आहे. बरेचसे माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे दावे होऊ लागल्याने नगरसेवकांना पक्षात थांबविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागणार आहे. तिदमे यांच्या नियुक्तीनंतर शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी घडामोडींचा अंदाज बांधत आहेत. तिदमे यांच्यासोबत कोण कोण जाऊ शकते, त्यांना रोखण्यासाठी काय करता येईल, यावर सेनेच्या गोटात मंथन सुरू झाले आहे.