लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी स्थानिक २० हून अधिक अधिकाऱ्यांचे पथक सोमवारी उत्तर प्रदेशकडे मार्गस्थ झाले. या दौऱ्यात सहभागी होण्यास अनेक जण इच्छुक होते. यामुळे लांबलचक झालेल्या यादीला विभागीय आयुक्त कार्यालयाने कात्री लावली. नावे वगळलेल्या काही उत्साही मंडळींनी स्वखर्चाने प्रयागराज गाठण्याची तयारी दर्शविल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

२०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये गोदा काठावर कुंभमेळा होत आहे. नियोजनाची लगबग सुरू आहे. त्या अनुषंगाने प्रयागराज येथील कुंभमेळ्यात लाखो भाविकांच्या दृष्टीने उभारलेली व्यवस्था, सोयी-सुविधांची पाहणी करण्यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखालील पथकात जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी श्रेया देवचक्के यांच्यासह पोलीस, बांधकाम, राज्य परिवहन आदी विभागांचे प्रमुख अधिकारी वा त्यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

दौऱ्याची तारीख निश्चित झाल्यापासून प्रयागराजला जाण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू होते. विविध विभागांकडून प्राप्त झालेल्या इच्छुकांची यादी ५० ते ७० जणांपर्यंत गेल्याचे सांगितले जाते. यामुळे वरिष्ठ चकीत झाले. विभागीय आयुक्त कार्यालयाने सिंहस्थ नियोजनाशी संबंधित विभागांचे प्रमुख अथवा त्यांचे प्रतिनिधी वगळता इतरांच्या नावांना कात्री लावल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. यातील काही अधिकारी इतके उत्साही होते की, त्यांनी स्वखर्चाने प्रयागराजला येण्याची तयारी दर्शविली. यामुळे काही अधिकारी स्वत:हून प्रयागराजला जाण्याची शक्यता असल्याचे संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

Story img Loader