गर्भपात, वेळेआधी प्रसूती, अंगदुखी, कंबरदुखीचे प्रमाण वाढले
चारुशीला कुलकर्णी, नाशिक
तळ गाठलेल्या विहिरीतून पाणी उपसणे, हातपंप कित्येक वेळा हापसून कसाबसा हंडा भरणे आणि दोन-तीन किलोमीटरवरून डोईवर पाणी आणणे.. हे कष्टप्रद काम दुष्काळी भागांतील गर्भवतींच्या गर्भपाताचे कारण ठरत आहे. ‘चूल आणि मूल’ या चाकोरीतून बाहेर पडून आता या महिलांचा जीवन संघर्ष ‘चूल आणि पाणी’ या परिघात सुरूच आहे.
इतकेच नव्हे तर, वेळेआधीच प्रसूती, अतिरक्तस्राव, अंगदुखी अशा त्रासांनाही या महिलांना सामोरे जावे लागत आहे. महिलांना चूल आणि पाणी या दोन आघाडय़ांवर लढाई करावी लागत आहे. संपूर्ण दिवस याच कामात जातो. जगण्यासाठीचा संघर्ष महिलांना डोकेदुखी, कंबरदुखी, अंगदुखीसह अन्य व्याधींपर्यंत घेऊन गेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळी भागांतील या गंभीर प्रश्नांकडे सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
राज्यात दुष्काळ नवीन नाही. दर वर्षी त्याची तीव्रता कमी-अधिक असते. धो धो पाऊस कोसळणाऱ्या डोंगर-दऱ्यांमधील भागांत उन्हाळ्यात टंचाईला तोंड द्यावे लागते. तसेच सखल भागांत पावसाअभावी पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. भाग कुठलाही असला तरी पाणी आणण्याची जबाबदारी प्रामुख्याने महिलांच्या शिरावर असते. पाण्यासाठी दररोज कराव्या लागणाऱ्या पायपिटीचे आणि कष्टाचे पर्यवसान जन्माआधीच जीव गर्भात खुडला जाण्यात होत आहे. त्र्यंबकेश्वर तालुका हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण.
ज्या विहिरीत पाणी आहे, तेथेच कपडे धुण्याचे काम केले जाते. गणेशगाव ग्रुप ग्रामपंचायतीत तीनपैकी केवळ गणेश गावालगत विहीर आहे. तिचे पाणी ७० ते ८० फूट खोल गेले आहे. विनायकनगरच्या सर्व विहिरी कोरडय़ा पडल्या तर गोरठाणला केवळ एकाच हातपंपाला पाणी आहे. विनायकनगरच्या महिलांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावर कपडे धुण्यासाठी जावे लागते. पाणी आणण्यास घरातील पाच वर्षांची मुलगीही कमी पडते.
इतर वेळी काही वाटत नाही. मात्र, उन्हाळ्यात तळ गाठलेल्या विहिरीतून पाणी उपसताना प्रचंड त्रास होतो, अशी व्यथा जयश्री महाले यांनी मांडली. गरोदर असताना आणि पाळीच्या दिवसांत जीव नकोसा होऊन जातो. यामुळे अनेक व्याधींना सामोरे जावे लागत आहे. पाणी भरण्याचे किंवा आणण्याचे काम महिलांचे असल्याचेच गृहीत धरले जाते. त्यामुळे त्या दिवसांत मदत करायला कोणी पुढे येत नसल्याची तक्रार रोहिणी महाले यांनी केली.
अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या वेणुबाई खोटरे बाईचे काम बाईच करणार. त्रास होत आहे, होईलच. पण घरात आयते कोण खाऊ घालणार, असा प्रश्न करतात. या दिवसांत आराम करा, असे सांगण्याचे काम डॉक्टर पार पाडतात. पण तो आराम आपल्याला परवडणारा नसल्याचे महिला सांगतात.
सरकारची योजनाच नाही
बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. मात्र, गरोदरपणात पाण्यासाठीची भटकंती थांबवणारी योजना नाही. यामुळे अमृत आहार योजना, मानव विकासअंतर्गत बुडीत मजुरी, जननी-शिशू सुरक्षा योजनांमधून चाललेले प्रयत्न अपुरे ठरतात. आरोग्य सेवा विस्कळीत असल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय गाठणे परवडणारे नाही. यामुळे कुपोषण, वेळेआधीच बाळंतपण यासह अनेक व्याधींच्या दुष्टचक्रातून महिलांची सुटका झालेली नाही.
कुटुंबीयांच्या समुपदेशनाचा प्रयत्न
आदिवासी भागांत गरोदर मातेचे वय कमी असते. तिचे या काळात योग्य पालनपोषण व्हावे, सरकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचावा, बुडीत मजुरी मिळावी, घरातील कामांचा बोजा कमी व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे ‘वचन संस्थे’च्या डॉ. प्रणोती सावकार यांनी सांगितले. कुटुंबाचे समुपदेशन करत घरातील किमान पाणी भरण्याचा भार हलका केला जावा हे सांगूनही महिलांचा दिवसातील जास्तीतजास्त वेळ केवळ पाणी भरण्यात जातो. यामुळे गरोदरपण गुंतागुंतीचे होते. इतर वेळी कंबरदुखी, अंगदुखी, डोकेदुखीसह अन्य शारीरिक व्याधींना त्यांना सामोरे जावे लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.
महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती ही कधी कधी त्यांच्या जिवावर बेतते. विशेषत: गरोदरपणात पाण्यासाठी भटकंती केल्यामुळे परिसरातील काही महिलांची वेळेआधीच प्रसूती, क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलल्याने गर्भ पिशवीचे तोंड उघडणे, हा त्रास सहन करावा लागतो. काही वेळा बाळ गर्भात दगावते. काही वेळा वेळेआधीच बाळ जन्माला आल्याने कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे.
– डॉ. योगेश मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, त्र्यंबकेश्वर