लोकसत्ता लोकांकिकेची शुक्रवारी प्राथमिक फेरी

डोक्यात विचारांचं काहूर अन् ऊर्मी असली की, कलावंताच्या हातून एखादी कलाकृती आकारास येते. पण ती कलाकृती आकारास येत असताना कल्पना ते वास्तव हा प्रवास त्या कलावंताला खूप काही शिकवून जातो. अशाच संमिश्र अनुभवाची शिदोरी ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत एकांकिका करताना नवरंगकर्मीच्या गाठीशी बांधली जात आहे.  शुक्रवारी नाशिकमध्ये लोकांकिकाची प्राथमिक फेरी होणार आहे. रंगीत तालिमेसाठी लागणारी, जागा, नाटक उभे करण्यासाठी केली जाणारी आर्थिक तजवीज अशा बिकट  परिस्थितीवर  ‘हौस’ मात करील असा कलावंतांना विश्वास आहे.

लोकांकिका स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक, कला मंडळासह एकांकिकाच्या तालमींनी वेगळा माहोल तयार केला आहे. प्राध्यापक आणि सहकलाकारांच्या मदतीने नाटक रंगमंचावर आणण्याचा प्रवास पुढील दिशा स्पष्ट करणारा असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. आंतरमहाविद्यालयीन नाटय़ स्पर्धेत उतरायचे तेच मुळात जिंकण्यासाठी, या ऊर्मीने सर्व संघ सध्या तयारी करीत आहेत. यासाठी महाविद्यालयाच्या रिकाम्या खोल्या रंगीत तालमीसाठी वापरल्या जात असताना काही ठिकाणी मित्राच्या घराची गच्ची, प्राध्यापकांच्या घराचा वापर केला जात आहे.

विद्यार्थ्यांच्या उत्साहाला दिशा देण्याचे काम महाविद्यालय पातळीवर होत असले तरी नाटक उभे करण्यासाठी आर्थिक तजवीज करायची कशी, असा प्रश्न काही संघांसमोर आहे. स्पर्धेसाठी नाटक कसे उभे करायचे, त्यासाठीच्या निधीची जमवाजमव आणि एकूणच नियोजन कसे करायचे, या सर्व प्रश्नांची स्पर्धा आली की डोक्यात भुणभुण सुरू होते. स्पर्धेची तारीख, स्थळ पहायचे आणि कला मंडळाकडे विचारणा करायची. महाविद्यालय स्पर्धा किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी काही विशिष्ठ रक्कम कला मंडळाकडे देते. त्यात संबंधितांचा प्राधान्यक्रम ठरलेला असतो. आपल्या संघाने स्पर्धेतून पारितोषिक आणावे, अशी महाविद्यालयाची अपेक्षा असते, असे नाशिकच्या के. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या सूरज बोढाईचे म्हणणे आहे. अशा वेळी महाविद्यालयाने दिलेल्या रकमेत नेपथ्य रचनेसह अन्य खर्च कसा बसवावा, याचे नियोजन होते.

आर्थिक क्षमता कमी असेल तर लेव्हल आणि मोडे याच्यावर किंवा प्रकाश योजनेच्या माध्यमातून नेपथ्याची कमतरता भागवायची किंवा नेपथ्य फारसे लागणार नाही असा एकांकिकेचा विषय ठरवायचा ही आजवरची पद्धत असल्याचे सूरज ने सांगितले. काही वेळा महाविद्यालयाने पैसे देऊनही अधिक खर्च होतो. तेव्हा त्याचा भाग सहभागींना उचलावा लागतो. हं. प्रा. ठा. कला महाविद्यालयाच्या आर्या शिंगणेचा अनुभव वेगळा आहे. चार वर्षांपासून वेगवेगळ्या नाटय़ स्पर्धेत त्यांचा संघ सहभागी होत आला आहे. अशा वेळी व्यवस्थापन कोणत्याही तांत्रिक, आर्थिक बाबींचा बागुलबुवा करीत नाही. विद्यार्थ्यांच्या मनात डोकावत कुठला विषय स्पर्धेसाठी योग्य आहे, याविषयी प्राचार्य प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्या प्रा. डॉ. वृंदा भार्गवे सर्व मदत करतात. आर्थिक भार आमच्यावर पडणार नाही, आम्ही पूर्णत नाटकावर लक्ष केंद्रित करू याची काळजी घेतली जाते.

जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाचा मनोज पाटीलच्या मते स्पर्धेत सहभागी होण्याकरिता महाविद्यालयांकडून कधीच नकार नसतो. प्रत्येक स्पर्धेसाठी विशिष्ट रक्कम ठरलेली असते. त्या रकमेच्या बाहेर खर्च गेला तर स्पर्धा समन्वयक असणारे शिक्षक खर्च करतात. तो त्यांच्याकडूनही होणार नसेल तर अशा वेळी आम्ही आमच्या पातळीवर ती जबाबदारी उचलतो, असे मनोज सांगतो.

ग्रामीण भागातील एका स्पर्धकाने प्राथमिक फेरीत सहभागी होताना निधी मिळतोच असे नाही याकडे लक्ष वेधले. त्यावेळी नाटकात वापरण्यासाठी कोणाच्या तरी घरातील काही सामान उचलून आणावे लागते. वेशभूषेच्या बाबतीतही असेच होते. आम्ही आमच्या पातळीवर नेपथ्य, वेशभूषेचा प्रश्न सोडवतो. संगीतासाठी महाविद्यालयाची ध्वनी यंत्रणा उचलून आणतो. येण्या-जाण्याचा खर्च कधी महाविद्यालय तर कधी आम्हीच परिचितांची गाडी घेऊन करतो, हेही त्याने मांडले.

निधी आहे, पण प्राधान्यक्रम पूर्वनिश्चित

कला किंवा सांस्कृतिक मंडळाचा निधी असतो, पण त्याचा प्राधान्यक्रम ठरलेला असतो. विद्यार्थ्यांना सर्वच स्पर्धामध्ये उतरायचे असते. याशिवाय महाविद्यालयाचे स्वतचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात. अशा स्थितीत सांस्कृतिक निधी कमी पडतो. यावर मात करण्यासाठी जो विद्यार्थी नाटकाचे किंवा स्पर्धेचे शिवधनुष्य पेलतोय त्याची क्षमता आणि कौशल्यावर पुढचे सर्व अवलंबून असते. काही वेळा शिक्षकही मुले चांगले काही करत असल्याचे पाहून आर्थिकदृष्टया मदतीचा हात पुढे करतात. आर्थिक कमतरतेची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी विद्यापीठ स्तरावर सांस्कृतिकसाठी स्वतंत्र निधी असणे गरजेचे आहे. त्यात सध्या ‘मी टू’ चळवळीमुळे पुरुष शिक्षक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेण्यास फारसे उत्सुक नाही, तर महिला वर्ग कौटुंबिक जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त फारसे सक्रिय राहण्यास तयार नाही, अशा विचित्र परिस्थितीत विद्यार्थी सध्या अडकले आहेत.

– प्रा. डॉ. वृंदा भार्गवे, उपप्राचार्या, हं. प्रा. ठा. महाविद्यालय, नाशिक.

विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही..

महाविद्यालयाचा स्वतंत्र नाटय़शास्त्र विभाग आहे. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्या दृष्टीने सर्व खर्चाची जबाबदारी आमची शैक्षणिक संस्था घेते. मुलांवर कुठलाही आर्थिक ताण किंवा तांत्रिक जबाबदारी येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांनी आपले लक्ष अभिनयावर केंद्रित करावे यासाठी सारा खटाटोप आहे.

-हेमंत पाटील (मुलजी जेठा महाविद्यालय, नाटय़शास्त्रविभाग)

Story img Loader