आशयघन संहितांमुळे स्पर्धेतील चुरस वाढणार
कुठलेही नाटक आशयघन संहितांमुळे स्पर्धेतील चुरस वाढणारकलावंतांच्या कसदार अभिनयामुळे लक्षात राहत असले तरी, नाटकाचा डोलारा संहितेवर उभा असतो. अशाच आशयघन संहितेचा शोध घेताना नवोदित रंगकर्मीचा कस लागतो. लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेचे वेगळेपण जपण्यासाठी यंदाही युवा रंगकर्मी स्वत: लिहिते झाले, तर काहींनी लेखकांची सहमती घेऊन नाटकाच्या तालमींना सुरुवात केली आहे. स्पर्धेवर छाप पाडण्यासाठी सामाजिक प्रश्नांसह वेगवेगळ्या विषयांकडे लक्ष वेधणाऱ्या आशयघन संहितांचा यंदाही समावेश असल्याने स्पर्धेतील चुरस वाढली आहे.
शुक्रवारी कुसुमाग्रज स्मारकात ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची विभागीय प्राथमिक फेरी होणार आहे. लोकसत्ता लोकांकिकेचे वैशिष्टय़े म्हणजे सबकुछ विद्यार्थी हे होय. हे वेगळेपण संहिता निवडण्यापासून एकांकिका रंगमंचावर आणण्यापर्यंत जपले जाते. यंदाही एकांकिकेचा आत्मा असणारी संहिता निवडण्यात आणि लेखन करण्यात लेखक, दिग्दर्शकांचा कस लागला. याविषयी लासलगाव महाविद्यालयाचे प्रा. दिलीप शेटे यांनी यंदा सौंदर्यशास्त्रावर आधारित एकांकिका बसविण्यात आल्याचे सांगितले. साहित्यिकांचा सौंदर्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, यासंबंधित साहित्याचे वेगवेगळे प्रवाह यावर भाष्य करताना शेवट अनपेक्षित आहे.
एकांकिकेतील पात्र लक्षात राहण्यासाठी मेहनत घ्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्रा. हेमंत पाटील यांनी नाटक किंवा एकांकिकेसाठी विषय खूप असले, तरी विद्यार्थ्यांची मानसिकता आणि त्यांच्या क्षमतांचा विचार करून संहितेची निवड केली जाते, असे सांगितले.
विद्याथ्र्र्याची मानसिकता, भूमिकेची समज पाहता पात्र नाटकात खुलत जाऊ द्यावे लागते. यंदाही अशाच वेगळ्या विषयाची निवड केली असून तीन पात्रांवर एकांकिका उभी राहिली आहे. विद्यार्थ्यांनाही आपल्याला काय द्यायचे हे समजल्याने संहितेचा विषय ते सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवीत असल्याचे पाटील यांनी मांडले.
बी.वाय.के. महाविद्यालयाच्या प्रिया जैनने स्पर्धेसाठी नाटक म्हणजे सामाजिक बांधिलकी जपण्याचे माध्यम असे म्हटले जाते. मात्र ही चौकट मोडत काही आगळेवेगळे देण्याचा प्रयत्न ‘तुकाराम डाऊनलोडिंग’ साठी करण्यात आल्याचे नमूद केले. तंत्रज्ञान आणि तुकाराम यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पान ३ वर
पान १ वरून बऱ्याचदा विषयाची निवड करताना बंधन येते, पण आपल्या जवळ जे आहे त्याचा विचार करून तंत्रज्ञान आणि तुकाराम यातून एक वेगळा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशी भूमिका मांडली. लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या प्रा. प्रवीण जाधव यांनी ‘लंगर’या एकांकिकेच्या माध्यमातून सामाजिक विषयवार भाष्य करण्यात आल्याची माहिती दिली. एखादा विषय हलक्या फुलक्या पद्धतीने लोकांसमोर जाण्यासाठी नाटक प्रभावीपणे काम करते हे लक्षात घेता अंधश्रद्धेवर ताशेरे ओढण्यासाठी लंगरची निवड केली. लग्न झाल्यावर नव्या जोडप्याचा संसार सुखाचा व्हावा यासाठी खंडोबा पुढे जागरण-गोंधळाचा कार्यक्रम होतो. या जागरणात लंगर पुरुष तोडतो. स्त्री का नाही, याकडे लक्ष वेधत स्त्री-पुरुष समानता, अंधश्रद्धा यावर नाटकात भाष्य करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रायोजक
सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, के सरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर स्पर्धेचे टॅलेन्ट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहात आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी ‘झी मराठी’ हे टेलिकास्ट पार्टनर आणि ‘एबीपी माझा’ हे न्यूज पार्टनर आहेत.