स्मार्ट सिटीच्या प्रकल्प गोदा अंतर्गत गोदावरी काठावर वैशिष्ठ्यपूर्ण गुलाबांचे दर्शन घडणार आहे. रामवाडी परिसरात सुमारे ६०० गुलाबांची रोपे लावण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यात आजवर बघायला न मिळालेल्या अनेक गुलाबांचा समावेश आहे. नाशिकची कधीकाळी गुलशनाबाद ही ओळख होती. गोदाकाठचे सौंदर्य खुलविण्यासाठी गुलाबांच्या या वैशिष्ठ्यपूर्ण प्रजाती नाशिक रोझ सोसायटीने सुचविल्या आहेत.
हेही वाचा >>घोटीत दरोडेखोरांचा धुमाकूळ ; हल्ल्यात पाच जण जखमी
गोदावरी नदीच्या संवर्धनार्थ स्मार्ट सिटी कंपनी प्रकल्प गोदा योजना राबवित आहे. त्या अंतर्गत विविध टप्प्यात गोदा घाटाचे सौंदर्यीकरण, पदपथ, दगडी आसन, सायकल मार्गिका, वृक्षारोपण, अहिल्यादेवी होळकर पुलाखालील बंधाऱ्याला स्वयंचलित दरवाजा, चिंचबन ते हनुमान वाडी दरम्यान पादचारी पूल आदींचा अंतर्भाव आहे. कोट्यवधी रुपये खर्चून राबविला जाणारा गोदा प्रकल्प आधीपासून चांगलाच चर्चेत आहे. या प्रकल्पांतर्गत रामवाडीलगतच्या गोदा उद्यानात (गोदा पार्क) वेगवेगळी कामे प्रगतीपथावर आहेत. याच ठिकाणी दुर्मीळ गुलाबांचे छोटेखानी उद्यान दृष्टीपथास येणार आहे. या परिसरात सुमारे ६०० वैशिष्ठ्यपूर्ण गुलाब रोपांची लागवड केली जात असल्याचे स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी सांगितले. नाशिक रोझ सोसायटीने सुचविलेली झाडे बाहेरून मागविण्यात आल्याचे मोरे यांनी सांगितले. विविध रंगातील हे गुलाब असून त्यातील काही प्रजाती वैशिष्ठ्यपूर्ण आहेत.
हेही वाचा >>…अखेर जिल्हा दूध संघातील गैरव्यवहाराबद्दल गुन्हा दाखल; या बड्या नेत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
एकाच झाडावर विविधरंगी गुलाब
गोदा घाट परिसरात लागवड केल्या जाणाऱ्या गुलाबाच्या या वैशिष्ठ्यपूर्ण प्रजाती आहेत. नाशिकमध्ये रोपवाटीका व इतरत्र हे गुलाब बघायला मिळत नाहीत. या प्रकारचे वैशिष्ठ्यपूर्ण गुलाब केवळ गुलाबांच्या उद्यानात दिसतात. देशात अशा गुलाब उद्यानांची संख्या मर्यादित आहे. उटी, चंदीगड, दिल्ली येथे गुलाब उद्यान आहे. या उद्यानात असणाऱ्या गुलाबांच्या वैशिष्ठ्यपूर्ण प्रजाती या निमित्ताने प्रथमच नाशिकमध्ये बघता येतील. यात आपरा का डाबरा या प्रजातीच्या झाडाला वेगवेगळ्या रंगाची फुले येतात. गडद हिरव्या रंगाचे गुलाब शक्यतो दिसत नाही. त्यामुळे या हिरव्या रंगाच्या गुलाबाच्या दोन प्रजाती येथे लागवड होत आहे. काही जगप्रसिध्द गुलाबांचाही समावेश आहे. सुगंधासाठी प्रसिध्द असलेला पापा मिलांट येथे असेल. तसेच अहिल्या व रंगोत्सव या गुलाबाच्या दोन स्वदेशी प्रजातीची रोपांची लागवड होत आहे. पहिल्या टप्प्यात वेगवेगळ्या ६० ते ७० प्रजातांची एकूण ६०० झाडे लावली जात आहे. भविष्यात त्यांची संख्या वाढल्यास वैशिष्ठ्यपूर्ण गुलाबाचे उद्यान असणाऱ्या शहरात नाशिकचाही समावेश होऊ शकतो, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.