जामनेर तालुक्यातील गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना नाईकडा समाजाच्या महाकुंभासाठी राज्यभरातूनच नव्हे, तर देश-विदेशातून मदतीचा ओघ सुरू आहे. महाकुंभात संत-महंत, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांचीही उपस्थिती राहणार आहे. सद्यःस्थितीत १५ लाख भाविकांना पुरेल एवढा धान्यसाठा झाला असून, इतर अत्यावश्यक वस्तूंच्या स्वरुपातही मदत येत असल्याची माहिती श्याम चैतन्य महाराजांनी दिली.
गोद्री येथील महाकुंभस्थळी श्याम चैतन्य महाराजांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गोद्री येथे २५ ते ३० जानेवारी या कालावधीत महाकुंभ मेळावा होत आहे. महाकुंभाची तयारी पूर्णत्वास येत असून, ५०० एकर परिसरात महाकुंभ होणार आहे. भाविकांच्या निवास व्यवस्थेसाठी सात नगरांची तात्पुरत्या स्वरुपात निर्मिती करण्यात आली आहे. पंधरा लाख भक्त येणार असले, तरी ५० हजार भाविक मुक्कामाला असतील, असा अंदाज आहे. त्यांच्या निवासासाठी ७० मंडपांची व्यवस्था केली आहे. भोजनासाठी १० स्वयंपाकगृह असतील. भाविक-भक्तांच्या सोयी-सुविधांसाठी निवासस्थानापासून स्वच्छतागृहापर्यंतची सर्व व्यवस्था केली जात आहे. प्रत्येक मंडपात शुद्ध पाणी पोहोचेल अशी व्यवस्था, तसेच वीज खंडित झाल्यास १० जनित्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. अडीच एकर परिसरात देशभरातील संत-महंतांच्या निवासस्थानासाठी संतकुटी उभारण्याचे काम सुरू असल्याचे श्याम चैतन्य महाराजांनी सांगितले.
हेही वाचा – जळगाव जिल्हा दूध संघातील नोकरभरती रद्द; अध्यक्ष मंगेश चव्हाण यांची माहिती, खडसेंना दणका
गोद्रीत समाजाचे मार्गदर्शक धोंडिराम बाबा आणि चंद्रबाबा यांची मंदिरे बांधून २५ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यानिमित्तानेच महाकुंभ मेळावा घेण्यात येत आहे. महाकुंभ राजकीय असल्याचा आरोप खोटा असल्याचे त्यांनी सांगितले, श्याम महाराजांनी सांगितले.