लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: येथील परिवर्त बहुउद्देशीय संस्थेतर्फे पाच नोव्हेंबर रोजी परिवर्त मराठी साहित्य परिषदेचे आयोजन शहरातील रोटरी क्लब सभागृहात करण्यात आले आहे.
या परिसराला राजा ढाले साहित्य नगरी आणि विचारपीठाला विद्रोही कवी स्मृतीशेष धुरंधर मिठबावकर असे नाव दिले आहे. प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. बजरंग बिहारी तिवारी (दिल्ली) हे परिषदेचे अध्यक्ष असून, प्रसिद्ध लेखक तथा ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव हे परिषदेचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी स्वागताध्यक्ष उद्धव गांगुर्डे, कार्यवाह साहित्यिक प्रा. गंगाधर अहिरे, सचिव दिनकर पवार आणि कवी अमोल बागूल उपस्थित असतील. उद्घाटन सत्रात महाकवी वामनदादा कर्डक स्मृती ‘वादळवारा’ सन्मान डॉ. सागर जाधव, राजा ढाले स्मृती ‘वैचारिक संशोधन’ पुरस्कार महेंद्र गायकवाड आणि कवी अरुण काळे स्मृती ‘अजातशत्रू’ पुरस्कार कवी अशोक पळवेकर यांना प्रदान केला जाणार आहे.
आणखी वाचा-दुष्काळी तालुका यादीत नांदगाव नसल्याने नाराजी, शिवसेना आमदाराचे मुख्यमंत्र्यांना साकडे
दुसऱ्या सत्रात प्रा. ईसादास भडके यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्तमान स्थितीत : विवेकशील लेखकांची भूमिका’ या विषयावर परिसंवाद होईल. तर तिसऱ्या सत्रात जिल्ह्यातील निवडक कलावंत व साहित्यिकांना सन्मानित केले जाणार आहे. समारोपाच्या सत्रात कवयित्री छाया कोरेगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. त्यात अविनाश गायकवाड, मनीष तपासे, ॲड. अशोक बनसोडे, काशिनाथ वेलदोडे, अलका कुलकर्णी आदींचा समावेश असणार आहे. चित्रकार देवेंद्र उबाळे या़चे चित्र प्रदर्शन व शिल्पकार दीपक भालेराव यांचे शिल्पांचे प्रदर्शन आणि पुस्तक विक्रीचे कक्षही परिषद स्थळी असणार आहे.