नाशिक – रंगाची उधळण करण्यासाठी आणि रहाडींमध्ये डुंबण्यासाठी नाशिक सज्ज झाले आहे. रंगपंचमीनिमित्त शहरात विविध मंडळांनी वर्षानृत्यासाठी (रेन डान्स) व्यवस्था केली असून या आधुनिक पध्दतीऐवजी परंपरेला प्राधान्य देणाऱ्यांसाठी जुन्या नाशिकमधील रहाडी खुल्या आहेत. रंग, पिचकाऱ्या, रंगबेरंगी फुगे यासह अन्य सामानाने बाजारपेठ रंगपंचमीसाठी सजली आहे. नागपूर येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर, अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

नाशिककरांची रंगपंचमी काहीशी वेगळी असते. धुलिवंदनऐवजी रंगपंचमीला नाशिकमध्ये विशेष महत्व आहे. जुन्या नाशिकमध्ये पेशवेकालीन रहाडी आहेत. यंदा रंगपंचमीसाठी त्यापैकी सात रहाडी खुल्या आहेत. यंदा शिवाजी चौक साती आसरा मंदिराजवळील रहाड कित्येक वर्षानंतर डुंबण्यासाठी मिळण्याची शक्यता आहे. दुपारी विधीवत पूजनानंतर या रहाडी डुंबण्यासाठी खुल्या होतील. दुसरीकडे, कॉलेजरोड, मेनरोड, रविवार कारंजा, भद्रकाली, पंचवटी परिसरात ठिकठिकाणी थिरकत्या गाण्यांच्या चालीवर वर्षानृत्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, रंगपंचमीला खऱ्या अर्थाने रंग देणाऱ्या वैविध्यपूर्ण रंगांनी बाजारपेठ सजली आहे. रंगपंचमीच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत उत्साह असला तरी मागणी फारशी नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. सोमवारी नागपूर येथे झालेली दंगल, परीक्षांचे दिवस, उन्हाचा वाढता तडाखा या कारणांमुळे रंग आणि पिचकाऱ्यांना मागणी घटल्याचा दावा विक्रेत्यांनी केला आहे. याविषयी पिचकारी विक्रेते विक्रांत एकमोडे यांनी माहिती दिली. रंगपंचमी अवघ्या काही तासांवर आली तरी मागणी नाही. शनिवार, रविवारी खरेदी अपेक्षित होती. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद नसल्याचे त्यांनी सांगितले.

बाजारपेठेत मोदी पिचकारी, योगी पिचकारी, मोटुपतलु पिचकारी असे विविध प्रकार १५ रुपयांपासून पुढे दीड हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. रंग विक्रेते संजय पानपाटील यांनी, नैसर्गिक रंग १०० रुपये किलो दराने विकले जात असल्याचे सांगितले. सिकंदर ही रंगाची बाटली ६० रुपये, फवारणी रंग १०० रुपये अशी विक्री सुरू आहे. पर्यावरणपूरक टिळा होळीसाठी नैसर्गिक रंगांना मागणी असून पक्का रंग पडून आहे. याशिवाय पाण्याचे फुगे तसेच सोनेरी रंगांविषयी विचारणा होत असल्याचे पानपाटील यांनी नमूद केले.

दरम्यान, जुन्या नाशिमधील अमरधाम रस्त्यावरील शिवाजी चौकात असलेली रहाड कित्येक वर्षानंतर खोदण्यात आली असून रंगपंचमीसाठी ही रहाड खुली करावी, अशी मागणी शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) वतीने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कर्णिक यांना भेटलेला शिष्टमंडळात ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल, राज्य संघटक विनायक पांडे, सहसंपर्कप्रमुख दत्ताजी गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी आदींचा समावेश होता.

नाशिक पोलीस सतर्क

नागपूर येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस सतर्क झाले आहेत. भद्रकाली परिसरात रहाडीच्या निमित्ताने जमणारा जमाव पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी अडथळे टाकण्यात आले आहेत. काही ठिकाणी रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक रहाडीच्या ठिकाणी प्रभारी पोलीस निरीक्षकासह इतर कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त, राज्य राखीव दलाचे १२० जवान असतील, मंडळाला स्वयंसेवक नियुक्त करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक रहाडीजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. दंगल नियंत्रण पथकही तैनात राहणार आहे. भद्रकाली परिसर संवेदनशील असल्याने या परिसरात ४०० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी कार्यरत राहतील. – किरणकुमार चव्हाण (पोलीस उपायुक्त)