नाशिक : मनोज जरांगे यांचा सात ऑगस्टपासून राज्यातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर आदी भागात होणाऱ्या दौऱ्याचा समारोप १३ तारखेला नाशिकमध्ये शांतता फेरीने होणार आहे. या फेरीत लाखो मराठा समुदायाला सहभागी करण्याची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे. या माध्यमातून ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या जिल्ह्यात एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
शहर सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जरांगे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, नांदूरनाका येथील साईलीला लॉन्समध्ये नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी विविध ठराव मंजूर करण्यात आले. जरांगे यांच्या राज्यस्तरीय दौऱ्याच्या समारोपानिमित्त शहरात निघणाऱ्या शांतता फेरीत मराठा समाजाला कुटुंबासह सहभागी करण्याचे नियोजन एका ठरावात करण्यात आले आहे. १३ ऑगस्ट रोजी होणारी जरांगे यांची शांतता फेरी तपोवन येथून सुरू होईल. पंचवटी, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, मेहेर चौकमार्गे शिवतीर्थ असा फेरीचा मार्ग आहे. या ठिकाणी जरांगे हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करून शांतता फेरीचे काटेकोरपणे नियोजन केले जाणार आहे. समाजाच्या नावाने समाजमाध्यमात कुठलीही दुफळी निर्माण होईल असे संदेश टाकू नये, असा ठराव बैठकीत करण्यात आला.
हे ही वाचा… मालेगावजवळ गिरणा नदीत १५ जण अडकले- बचावकार्य सुरु
बैठकीत, सकल मराठा क्रांती मोर्चा नाशिक जिल्ह्याच्यावतीने शरद पवार यांना घरी जाऊन १९९४ मधील शासकीय अध्यादेशाबाबत जाब विचारण्याचे निश्चित झाले. तालुकानिहाय बैठकांचे आयोजन करून शांतता फेरीचे नियोजन, फेरीसाठी जिल्ह्याच्यावतीने एक समिती असावी आदी ठराव करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाचे करण गायकर, ॲड. शिवाजी सहाणे, विलास पांगारकर, नानासाहेब बच्छाव, बंटी भागवत आदींनी ठराव मांडले. जिल्हा सकल मराठा समाज सर्व तालुका व शहर एकत्रित बैठक सोमवारी दुपारी एक वाजता साईलीला लॉन्स याच ठिकाणी घेऊन १३ तारखेच्या नियोजनासंदर्भात समित्यांची स्थापना केली जाणार आहे.
© The Indian Express (P) Ltd