प्रशासकीय यंत्रणेकडून तयारीला सुरुवात

बागलाण येथील प्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथील भगवान ऋषभदेव १०८ फूट मूर्ती निर्माण समितीतर्फे आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन २२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्री उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती प्रथमच जिल्ह्य़ात येत असल्याने उपरोक्त परिसरात सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यप्रवण झाली आहे. सुटी असूनही बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन तयारीचा आढावा घेण्यात आला.

जागतिक अहिंसा संमेलनास  राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह डझनभर मंत्री उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती प्रथमच येत असल्याने शासकीय यंत्रणा अक्षरश: झपाटून कामाला लागली आहे.

राष्ट्रपतींचे ओझर विमानतळावर आगमन झाल्यानंतर तिथून लष्कराच्या हेलिकॉप्टरने ते कार्यक्रमस्थळी जाणार आहेत. महोत्सवाच्या ठिकाणी हेलिपॅडची उभारणी केली जाणार असून कार्यक्रम स्थळावरील मंडप, व्यासपीठ, मांगीतुंगीला जोडणारे रस्ते, मैदान, वीज, पाणी पुरवठा, आपत्ती व्यवस्थापन अशा सर्व पातळीवर प्रशासनाची तयारी सुरू आहे. या कामांचा आढावा जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी घेतला.

या दौऱ्यात कोणतीही उणीव राहू नये म्हणून यंत्रणा खबरदारी घेत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सूचना केल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्यासह पोलीस, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, महावितरण, आरटीओ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, अलिकडेच सुरक्षेच्या दृष्टीने मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, सहाय्यक पोलीस अधीक्षक शशिकांत शिंदे आदींनी मांगीतुंगीला भेट देऊन पाहणी केली होती. याबाबतचा अहवाल तत्काळ गृह विभागास पाठविण्यात आला.

उद्या पाहणी दौरा

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी परिसरात विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी भेट देऊन पाहणी करणार आहेत. या दौऱ्यांतर्गत ओझर विमानतळास भेट दिली जाणार आहे.

Story img Loader