नाशिक – लोकसभा निवडणूक शांततेत होण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ३१३ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांचा मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्यांकडून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात येऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. याअंतर्गत पंचवटी परिसरात ५९, सरकारवाडा पोलीस ठाणे ६८, अंबड १०४, नाशिकरोड ८२ अशी कारवाई करण्यात आलेल्यांची संख्या आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत एमपीडीए, मोक्का, तडीपार, फौजदारी प्रक्रियेअंतर्गत प्रतिबंधक कारवाया आणि शस्त्रसंबंधी अधिनियमअंतर्गत तीन हजार ५१८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तपासणी मोहिमेअंतर्गत गुन्हेगार तसेच संशयित वाहने तपासण्यात येत आहेत. आचारसंहितेचा भंग करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. कोणाला काही अडचण असल्यास नियंत्रण कक्ष ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

हेही वाचा – नाशिक मतदारसंघात ओबीसींची मते महत्त्वाची

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस

शहर पोलिसांच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावत त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. याबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांना नाशिक आयुक्तालय हद्दीत वास्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. वास्तविक निवडणूक प्रचार यंत्रणा, केंद्र यंत्रणा राबविणारे हे पदाधिकारी असल्याचे बडगुजर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – तेजस गर्गे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नाशिक शहरात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर बंदोबस्ताची धुरा आहे. पोलीस आयुक्तालयाअंतर्गत नागरिकांना मतदान निर्भयपणे करता यावे, यासाठी काम करण्यात येणार आहे. नाशिक शहरात एक हजार २२७ केंद्र असून पोलीस आयुक्तालयातील १८१ अधिकारी, एक हजार ८१६ अंमलदार, १७ गृहरक्षक तसेच बाहेरील ४४ अधिकारी, ४७० अंमलदार, एक हजार गृहरक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान यंत्र ठेवण्यात येणाऱ्या ठिकाणी तीनस्तरीय बंदोबस्त राहणार आहे. यामध्ये केंद्रीय आणि राज्य राखीव पोलीस दल, स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली.

Story img Loader