नंदुरबार – मिरचीचे आगार समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात यंदा मिरचीचे उत्पादन घटल्याने बाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ७० टक्यांनी आवक कमी झाली आहे. परिणामी, यंदा लाल तिखटाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशात आंध्र प्रदेशातील गुंटूरनंतर मिरची उत्पादनात नंदुरबार जिल्हा हा प्रसिध्द आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात ओल्या लाल मिरचीची आवक होते. ही मिरची पथारीवर सुकवून प्रक्रिया केल्यानंतर तिची लाल भुकटी बाजारात विक्रीसाठी आणली जाते. शेतकऱ्यांसाठी नगदी पीक मानल्या जाणाऱ्या मिरचीला यंदा जास्तीच्या पावसाचा फटका बसला. त्यामुळे मिरची उत्पादकांचे नुकसान झाले. यंदा सरासरीपेक्षा २५ टक्के जास्तीचा पाऊस झाल्याने मिरची पिकावर मर आणि मूळ कुजवा रोगाचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे १५ ते २० टक्के शेतकऱ्यांनी मिरचीची रोपे उखडून टाकली. शिल्लक पिकावरही रोग पडल्याने फुलोरा येऊ शकला नाही. परिणामी मिरची उत्पादनात घट झाली आहे.

हेही वाचा >>>राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मिरचीची आवक सुरु झाली. जवळपास तीन महिन्यात आतापर्यंत ४५ ते ५० हजार क्विंटल आवक झाली आहे. प्रारंभी ओल्या लाल मिरचीला २५०० ते चार हजार रुपये असा भाव मिळाला. सध्या तीन हजार ते ५१०० रुपये असा भाव मिळत आहे. कोरड्या लाल मिरचीला सहा हजार ते १२ हजार रुपये भाव आहे. जेमतेम दीड महिन्याचा हंगाम बाकी असून उर्वरित दिवसात ५० हजार क्विंटल आवक होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजेच यंदा एक लाख क्विंटल मिरची बाजार समितीत येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी तीन लाख क्विंटलहून अधिक आवक झाली होती. आवक घटल्याचा परिणाम लाल तिखटाचे भाव वाढण्यात होणार आहे. वाढती मागणी पाहता व्यापाऱ्यांना गुंटूरहून लाल सुकी मिरची मागवावी लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>दुकानात अल्पवयीन मुलास मारहाण, दोन संशयित ताब्यात

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नंदुरबार जिल्ह्यात झालेला अधिक पाऊस मिरची पिकासाठी हानीकारक ठरला. या महिन्यांमध्ये मिरची फुलोरा अवस्थेत असते. त्याचवेळी सतत पाऊस सुरु राहिल्याने फुलगळ झाली. त्यातच पावसामुळे निंदणी, कोळपणी ही कामे करण्यात अडथळा आला. परिणामी, रोगांचा प्रादूर्भाव वाढल्याने मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे. -पदमाकर कुंदे ( विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण विभाग, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार)

नंदुरबार बाजार समितीत मागील वर्षीच्या तुलनेत मिरची आवकमध्ये मोठीच घट पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे भावही वाढले असून सध्या सरासरी ३२०० ते ३३०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव दिला जात आहे. -योगेश अमृतकर (सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prices will increase due to reduced arrival of chillies nandurbar news amy