नाशिक – ग्रामीण भागातील रुग्णांसाठी शासनाने ई हॉस्पिटल अंतर्गत ई सुश्रुत प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीत प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या श्रेणीत इगतपूरी तालुक्यातील वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यात पहिल्या क्रमांकावर असून आतापर्यंत २९ हजार ८५४ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कौतुक केले असून जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रामध्ये या प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा >>> आषाढीनिमित्त पंढरपूरसाठी जिल्ह्यातून जादा बससेवा; प्रत्येक आगारातून २० अधिकच्या बस
ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. आजही कित्येक सरकारी रुग्णालयांमध्ये तपासणीची प्राथमिक माहिती देण्यासाठी रांग लागते. त्यामुळे वैतागून रुग्ण खासगी ठिकाणी उपचारासाठी निघून जातात. त्यातच जुना वैद्यकीय अहवाल नसल्यास अडचण येते. यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केद्रांमध्ये ई सुश्रुत हा उपक्रम सुरु केला आहे. याअंतर्गत रुग्णालयात नवीन रुग्ण आला की त्याला एक क्रमांक देण्यात येतो. जेव्हा डॉक्टर त्या रुग्णाला तपासतात, तेव्हा त्या रुग्णाच्या नोंदीत त्याचा वैद्यकीय अहवाल लिहिला जातो. पुन्हा तपासणीला येताना रुग्णाला जुना अहवाल सोबत आणण्याची गरज राहत नाही. या प्रणालीमुळे आरोग्य केंद्रांमधील कागदोपत्री होणारे कामकाज कमी होत असून परिणामी रुग्ण तसेच डॉक्टरांचाही वेळ वाचण्यास मदत होत आहे. रुग्णाच्या आजार व उपचाराची सर्व माहिती एका कळसरशी उपलब्ध होत आहे. बाह्यरुग्ण, आंतररुग्ण, औषध हे विभाग, प्रयोगशाळेचा अहवाल, एक्स-रे, वैद्यकीय चाचण्या आदींचा त्यात समावेश आहे. या माध्यमातून रुग्णांवर काय उपचार केले, कोणत्या वैद्यकीय चाचण्या केल्या, त्यांचा अहवाल हे सर्व मिळणे शक्य झाले आहे.
हेही वाचा >>> वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुलींसह तिघांचा अपघातात मृत्यू
नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णालय व्यवस्थापन माहिती व्यवस्था (हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम) या कार्यक्रमांतर्गत ई सुश्रुत प्रणाली राबविण्यात येत आहे. एखादा रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यावर आजाराची प्रारंभिक माहिती डिजिटल स्वरुपात नोंद केली जाते. त्यानंतर उपचार केले जातात. या प्रणालीअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी व कर्मचारी यांच्या प्रयत्नाने चांगल्या प्रकारे कामकाज करण्यात आले आहे. राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामधुन वाडीवऱ्हे केंद्र प्रथम क्रमांकावर आहे.