लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात देशभरातील सुमारे साडेसात हजार युवक-युवती नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. महोत्सवात विविध राज्यांची खाद्यसंस्कृती, लोककला व लोकसंस्कृतीसोबत विविध स्पर्धांच्या माध्यमातून युवाशक्तीच्या प्रतिभेचे दर्शन घडणार आहे. या निमित्ताने जणूकाही भारतच नाशिकमध्ये अवतरणार असल्याचे सुतोवाच भाजपचे नेते तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी केले. महोत्सवाच्या नियोजनास अत्यल्प कालावधी असल्याने भाजपकडून युध्दपातळीवर तयारीला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
केंद्र व राज्य शासनाचा क्रीडा व युवक विभाग, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातर्फे २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव १२ ते १६ जानेवारी या कालावधीत शहरात आयोजित करण्यात आला आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होईल. उद्घाटन सोहळ्यासाठी पंचवटीतील तपोवन येथील विस्तीर्ण मैदान निश्चित करण्यात आले. शुक्रवारी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी मैदानाची पाहणी करीत तयारीचा आढावा घेतला. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे दरवर्षी आवर्जुन या कार्यक्रमास उपस्थित राहतात. यंदाचा महोत्सव सोलापूर येथे नियोजित होता. परंतु, आपण आग्रहपूर्वक तो नाशिकमध्ये आणल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. महोत्सवांतर्गत विविध उपक्रम, स्पर्धा होणार असून त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन प्रगतीपथावर आहे.
आणखी वाचा-परीक्षा पे चर्चा नोंदणीसाठी मुख्याध्यापक, शिक्षणाधिकाऱ्यांवर दबाव; नाशिक विभागात कामात संथपणा
महोत्सवात देशातील वेगवेगळ्या भागातून हजारो युवक व अधिकारी-कर्मचारी सहभागी होतील. त्यांच्या निवास व्यवस्थेचे नियोजन केले जाणार आहे. प्रदर्शनात प्रत्येक राज्याचा कक्ष असणार आहे. आपापल्या राज्यातील खाद्य संस्कृतीचे सादरीकरण त्यातून होईल. दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होतील. त्यात प्रत्येक राज्यातील संघ व युवक सहभागी होतील. युवकांच्या प्रतिभेला चालना देण्यासाठी लोकनृत्य, लोकगीत, वक्तृत्व, कथा-काव्य लेखन, भित्तीपत्रक, छायाचित्रण, पाककला, हस्तकला, एकांकिका, पथनाट्य आदी स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. हे उपक्रम वेगवेगळ्या केंद्रात पार पडणार आहेत. नाशिककरांसाठी ही मोठी पर्वणी असून सर्वांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन महाजन यांनी केले. पाहणीवेळी भाजपच्या आमदार देवयानी फरांदे व आमदार राहुल ढिकले यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
विकसित भारतवर मंथन
महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ युवकांशी संबंधित विषयांवर संवाद साधतील, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. यावेळी न्हावाशेवा प्रकल्पाचे उद्घाटन होईल, अशी शक्यता नाही. परंतु, पंतप्रधान कार्यालयाकडून ते निश्चित होईल. सध्या केवळ हाच कार्यक्रम आहे. संकल्प यात्रा सध्या सुरू आहे. विकसित भारत यावर चर्चा होईल. त्या अनुषंगाने पंतप्रधान मार्गदर्शन करतील. हा राजकीय कार्यक्रम नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महोत्सवाचे वैशिष्ठ्य काय ?
- देशभरातून साडेसात हजार युवकांचा सहभाग
- विविध राज्यातील खाद्य संस्कृती, लोकसंस्कृतीचे दर्शन
- प्रतिभेला वाव देणाऱ्या अनेक स्पर्धा
- स्पर्धा, उपक्रमांसाठी विविध स्थळांची निश्चिती