जळगाव : जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे खासगी बस शनिवारी उलटून पाच जण जखमी झालेत. त्यात १२ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. जखमींमध्ये सुरत (गुजरात) येथील प्रवाशांचा प्रामुख्याने समावेश आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत स्वतः मदतकार्यात सहभाग घेतला.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुरत येथून शुक्रवारी सायंकाळी सुरत-अकोला ही खासगी बस निघाली होती. शनिवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईबाबा मंदिर परिसरात टायर फुटल्याने बस उलटली. त्यात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच, गावातील रहिवासी असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेतली. पालकमंत्री पाटील यांनी जखमींना बसबाहेर काढून रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केले. पाळधी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांना घटनेची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.
हेही वाचा…स्वाईन फ्लू आजाराने मालेगावात निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू
बसमधील प्रवासी विद्या निगडे (४०), सोनू मिस्तरी (२७), कौतिक गवळी (५०), गफारखान पठाण (४०), आशाबाई भोसले (४५, सर्व रा. सुरत, गुजरात) यांच्यासह १२ वर्षाच्या अर्चना निकडे (रा. काठोध, जि. बुलढाणा) हे जखमी झाले. त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची पाळधी येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.