लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : गुजरात राज्यातील सुरतहून विदर्भातील मलकापूर येथे जात असलेली खासगी आराम बस जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात वराड गावाजवळ मंगळवारी सकाळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. या अपघातात एका प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. चार प्रवासी गंभीर जखमी झाले.
सुरत येथून सोमवारी रात्री ९.३० वाजता एरंडोलमार्गे मलकापूर येथे जाण्यासाठी खासगी प्रवासी बस निघाली होती. बसच्या टपावर साड्यांचे मोठे गाठोडे ठेवलेले होते. मंगळवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास बस धरणगाव तालुक्यातील वराड गावाजवळ आल्यानंतर टपावरील साड्यांचे गाठोडे एका बाजूला झाले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित झालेली बस महामार्गावरील दुभाजक ओलांडून पलीकडे जाऊन उलटली. या अपघातात कविता नरवाडे (३०,रा.भीमनगर,उधना,सुरत) या प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्या पती सिद्धार्थ नरवाडे यांच्या उपचारासाठी नांदुरा येथे भावाकडे तीन मुलांना बरोबर घेऊन जात होत्या.
आणखी वाचा-नाशिक जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक जलसाठा, आरक्षणासाठी पालकमंत्र्यांची प्रतीक्षा
याशिवाय सोपान सपकाळ (५४, नरवेल, ता.मलकापूर), विठ्ठल कोगदे (७५, पळशी, जि.अकोला), विश्वनाथ वाघमारे (६५, वरणगाव,जळगाव), प्रशांत धांडे (३३,नरवेल ता.मलकापूर) हे बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. बस उलटल्यानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने उलटलेली बस सरळ करण्यात आली. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.