धुळे –सामाईक शेतजमिनीची खातेफोड करुन देण्यासाठी १४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिंदखेडा तहसील कार्यालयातील खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे येथील तक्रारदारासह त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांच्या नावाने गावात सामाईक शेतजमीन आहे. या शेतजमिनीची खातेफोड करण्यासाठी तक्रारदाराने अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडून तहसीलदार कार्यालयात नेले होते.
यावेळी रितेश पवार (३०, रा. पाटण, शिंदखेडा) याने तक्रारदाराची भेट घेतली. नायब तहसीलदारासह इतर अधिकारी आणि कर्मचारी आपल्या ओळखीचे असल्याचे सांगून खातेफोडचे काम पूर्ण करून देण्यासाठी संबंधितांना २० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यामुळेतक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, रितेशने तक्रारदाराकडे तडजोडीअंती १४ हजार रुपयांची मागणी केली. या पार्श्वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकाऱ्यांनी शिंदखेडा तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. लाच स्वीकारताना पवार यास रंगेहात पकडले.