निसर्गसौंदर्य, पर्यटनाचा केंद्रबिंदू आणि आल्हाददायक हवामान
इगतपुरी : निसर्ग सौंदर्याची खाण, पर्यटनाचा केंद्रबिंदू आणि आल्हाददायक हवामान असा त्रिवेणी संगम असलेल्या इगतपुरी तालुक्याची पर्यटकांप्रमाणेच चित्रपट निर्मात्यांनाही मोहिनी पडली आहे. त्यामुळेच करोना महामारीमुळे जाहीर झालेली टाळेबंदी बहुतांश प्रमाणात शिथील झाल्यानंतर या तालुक्यात विविध चित्रपटांच्या चित्रीकरणास सुरूवात झाली आहे. या निसर्गरम्य तालुक्यात काही दिवसांपासून अनेक मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण होत असल्याने स्थानिकांना रोजगाराचे नवीन क्षेत्र मिळाले आहे. सध्या तालुक्यात योगेश भोसले दिग्दर्शित वन फोर थ्री या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.
चित्रनगरी उभारण्यासाठी अत्यंत पोषक आणि अनुकूल नैसर्गिक स्थिती असलेल्या या तालुक्याची अनेक कलावंत, दिग्दर्शकांना भुरळ पडत आहे. मागील आठवडय़ापासून निसर्गसौंदर्याची जणूकाही खाण असलेल्या कावनई परिसरात वन फोर थ्री या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. प्रेमकथेवर आधारित हा चित्रपट असला तरी आईवडिलांच्या प्रेमाला प्राधान्य द्यावे, हा या चित्रपटाचा संदेश असल्याचे सांगण्यात येते. इगतपुरी तालुकाच असा निसर्गरम्य आहे की, या तालुक्याच्या निसर्गावर सर्वच प्रेम करतात. जुन्या, नव्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या तालुक्यात झाले आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये इगतपुरी तालुक्यातील सौंदर्याचे दर्शन यापूर्वीही झाले आहे. त्यामुळे शासनाकडूनही या तालुक्यात चित्रनगरी उभारण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.
काही महिन्यांपूर्वी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी स्थळांची पाहणी करत असताना शासनाचा दादासाहेब फाळके पुरस्कार लाभलेल्या बाजार चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश भोसले यांना इगतपुरी तालुक्यातील निसर्गसौंदर्य आवडले. आणि आपल्या वन फोर थ्री या मराठी चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण इगतपुरी तालुक्यात करण्याचा इरादा त्यांनी पक्का केला होता. त्याच अनुषंगाने मागील आठवडय़ापासून कावनई परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. कावनई परिसरातील श्रीक्षेत्र कपिलधारा तीर्थक्षेत्र येथे सिद्धेश्वर (महादेवाचे मंदिर) मंदिराचे ठिकाण चित्रीकरणात दाखविण्यात आले आहे. कावनई रस्त्याच्या वळणावर असलेल्या दर्गा येथे कव्वालीचे चित्रीकरण करण्यात आले असून या कव्वालीतून प्रेमाबाबतच्या सकारात्मक भावना दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच श्रीकपिलधारा अभियांत्रिकी महाविद्यालयातही चित्रीकरण करण्यात आले. या चित्रपटात नाशिक येथील अभिनेत्री शीतल आहिरराव यांच्यासह वृषभ शहा, सुरेश विश्वकर्मा (सैराट चित्रपटातील आर्चीचे वडील), शशांक शिंदे या प्रसिद्ध कलाकारांच्याही भूमिका आहेत. चित्रीकरणाच्या मुहुर्ताप्रसंगी श्री कपिलधारा अभियांत्रिकीचे अध्यक्ष कुलदीप चौधरी, दीपक मंगे, दिग्दर्शक योगेश भोसले आदी उपस्थित होते.
चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी स्थळे पाहिली. अनेक ठिकाणे नजरेत भरली. परंतु, इगतपुरी तालुक्यातील ठिकाणे पाहिल्यावर एक वेगळा आनंद आणि अनुभव मिळाला. इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य वातावरण पाहिल्यानंतर महाबळेश्वर, पाचगणीचाही विसर पडावा असा येथील निसर्ग मनाला भावला.
– योगेश भोसले (चित्रपट दिग्दर्शक)