नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजय सोनवणे यांचे व्हॉट्सअप खाते हॅक झाले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुलगुरू प्रा. सोनवणे यांच्यासह विद्यापीठातील एका अधिकाऱ्यांचेही व्हॉट्सअप खाते हॅक झाले. संबंधित क्रमांकावरून भ्रमणध्वनीतील वेगवेगळ्या क्रमांकावर आपणास तुमची मदत हवी आहे, असा संदेश दिला गेला.
प्रतिसाद देणाऱ्यांनी काय मदत हवी, अशी विचारणा केल्यावर पाच हजारपेक्षा अधिक रकमेची गरज असून उद्या दुपारनंतर पैसे देतो, असा संदेश देण्यात येत होता. कुलगुरू तसेच अन्य अधिकाऱ्याकडून होणारी पैशाची मागणी पाहता काही जणांनी विद्यापीठात विचारणा केली असता सर्व घोळ लक्षात आला. संशयितांविरूध्द सायबर गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.