नाशिक – दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा येथे मालवाहू वाहन, कार, आणि मोटरसायकल यांच्यात तिहेरी अपघात होऊन कारमधील प्रा. रामदास शिंदे (रवळस, ता. निफाड) यांचा जागीच मृत्यू झाला.
वलखेड फाटा येथे सोमवारी सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला. प्रा. शिंदे हे वणी येथील कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत होते. ते नाशिकहून वणी येथे कारने जात असताना वणीहून दिंडोरीकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाची धडक बसली. पाठीमागून येणारी मोटरसायकलही यावेळी दोन्ही वाहनांवर धडकली. अपघातात प्रा. शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. शिंदे यांचा मंगळवारी वणी येथे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता. दुचाकीस्वार विठ्ठल पागे (रा. आंबेवणी) हे अपघातात जखमी झाले आहेत.
हेही वाचा – नाशिक: आर्टिलरी सेंटरजवळ बिबट्या जेरबंद
वलखेड फाटा येथे टाकण्यात आलेले गतीरोधक हे निकृष्ट असल्यामुळे उखडले गेले आहे. गतीरोधक हे चांगल्या प्रकारचे टाकण्यात यावे, दिंडोरी बाजूकडे घेण्यात यावे. कारण ते जवळ गेल्याशिवाय दिसत नाही, अशी वलखेड येथील ग्रामस्थ व वाहनधारकांची मागणी आहे.