नाशिक – विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती.. हे ठामपणे सांगणाऱ्या कवी कुसुमाग्रजांचे मायमराठीवरील प्रेम सर्वश्रृत आहे. कुसुमाग्रजांचे शब्दांवरील प्रेम जपण्यासाठी राज्य शासन, मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्था, जिल्ह्यातील शिरवाडे ग्रामपंचायत यांनी पुढाकार घेतला आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांव्दारे कुसुमाग्रजांच्या गावाला राज्यातील कवितांचे गाव अशी ओळख मिळवून देण्यात येणार आहे. मराठी भाषा दिनानिमित्त यासंदर्भातील कार्यक्रम गुरूवारी सकाळी ११ वाजता मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिरवाडे येथे होणार आहे.
मराठी साहित्यात कवी कुसुमाग्रजांचे स्थान अबाधित आहे. त्यांच्या साहित्याचा अमूल्य ठेवा तसेच इतर नामवंत कवी-कवयित्री यांच्या कवितांच्या शब्द खजिन्याची गोडी एकाच ठिकाणी मराठीप्रेमींना अनुभवता यावी, यासाठी कवितेचे गाव म्हणून कुसुमाग्रजांचे जन्मगाव असलेल्या निफाड तालुक्यातील शिरवाडेची ओळख निर्माण करण्यात येत आहे. गुरूवारी शिरवाडे गावातील कुसुमाग्रज स्मारक येथे मराठी भाषा तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत कवितेच्या गावात कार्यक्रम होईल. यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांची प्रमुख उपस्थिती तसेच आ. दिलीप बनकर अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. कवितेच्या गावात कवितांची १५ दालने साकारण्यात येतील. उद्घाटन सोहळ्यात एक दालन खुले होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कुसुमाग्रजांच्या साहित्याच्या अनुषंगाने उर्वरीत दालने सुरू केली जातील. स्थानिक कवी, साहित्यिकांच्या साहित्याचा अंतर्भाव त्यात केला जाणार आहे.
कवितेच्या गावाच्या माध्यमातून प्रसिध्द कवींच्या कविता काव्यप्रेमींना एकाच ठिकाणी वाचता याव्यात यासाठी काम सुरू आहे. यासाठी शिरवाडे ग्रामपंचायत, पाणी वापर संस्था, काही सोसायट्या यांचे सहकार्य लाभत आहे. ही दालने बंदिस्त तसेच खुल्या स्वरूपात असतील. त्या अनुषंगाने आवश्यक साहित्य दिले जाईल. याची देखभाल ग्रामपंचायत तसेच संबंधित संस्था करणार आहे. साहित्य संवर्धनासह या माध्यमातून गावातील लोकांना रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठीही प्रयत्न होणार आहे.- शरद काळे (सरपंच, शिरवाडे -वणी, जि. नाशिक)