नाशिक – शह-प्रतिशह अशा डावपेचांमुळे राजकीय पक्षांतील मतभेद उफाळून आले असताना त्याचा शनिवारी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमावर कुठलाही प्रभाव पडू नये, याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. १४ ते २८ जुलै या कालावधीत कुठल्याही व्यक्तीचे चित्र, प्रतिकात्मक प्रेतयात्रा अथवा राजकीय नेत्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन, दहन करण्यास मनाई करण्यात आली आहे. मोठ्याने घोषणा देणे, वाद्य वाजविणे तसेच पाचपेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्रित जमण्यास बंदी राहणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम गंगापूर रस्त्यावरील डोंगरे वसतिगृह मैदानावर होत आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीतील अजितदादा गट सामील झाला. शिवसेनेतील बंडखोरीमुळे दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र कायम असताना त्यात राष्ट्रवादीच्या फुटीची भर पडली. हे दोन्ही गट परस्परांना लक्ष्य करीत आहेत. या राजकीय घडामोडींचे सावट कार्यक्रमावर पडू नये याची दक्षता घेतली जात आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये प्रतिबंधात्मक आदेशाची अमलबजावणी त्याचाच एक भाग म्हणता येईल.

हेही वाचा >>>नाशिक : शासन आपल्या दारीसाठी लाभार्थी वाढविण्याची धडपड; जिल्हा परिषदेतर्फे दोन लाखहून अधिक जणांना लाभ, प्रमाणपत्र

हेही वाचा >>>रानडुक्करांमुळे डाळिंब बागांचे नुकसान; बंदोबस्त करण्याची मागणी

राजकीय संघर्ष आणि आगामी मोहरम सण लक्षात घेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. शुक्रवारपासून १५ दिवस त्याची अमलबजावणी राहील. या काळात कुठलेही दाहक, स्फोटक पदार्थ सोबत नेणे, हत्यार व शस्त्र बाळगण्यास मनाई आहे. राजकीय नेत्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन वा दहन, प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यास बंदी राहणार आहे. सुरक्षितता धोक्यात येईल अशी आवेशपूर्ण भाषणे प्रसारित करता येणार नाहीत. सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून महाआरती करणे, फटाके फोडणे, घंटानाद, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करण्यास प्रतिबंध राहील. जमावबंदी लागू करत आंदोलन होणार नाही, याकडे लक्ष देण्यात आले आहे. पूर्वपरवानगीशिवाय सभा वा मिरवणूक काढण्यास बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prohibitory orders are enforced by the police to ensure that the regime of political conflict does not fall on its doorstep amy
Show comments