नाशिक : देशासह जगातील चाळीसहून अधिक देशांना पसंतीस उतरणारा शेतमाल पुरवणारी कृषिसंस्था म्हणून लौकिक असलेल्या कंपनीमध्ये आता थेट युरोपातून गुंतवणूक होणार आहे. ‘इंकोफिन’, ‘कोरीस’, ‘एफएमओ’ आणि ‘प्रोपार्को’या युरोपातील प्रसिद्ध गुंतवणूकदार समूहाने नाशिकमधील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीच्या सह्याद्री पोस्ट केअर कंपनीत ३१० कोटींची थेट परकीय गुंतवणूक केली आहे.
१०० टक्के शेतकऱ्यांच्या मालकीची भारतातील अग्रगण्य शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून ‘सह्याद्री फाम्र्स’ ओळखली जाते . सुमारे २०० हून अधिक गावातील सभासद सदस्य तसेच जोडलेले इतर शेतकरी असे एकत्रित १८ हजाराहून अधिक शेतकरी व या सर्वाचे मिळून ३१ हजार एकराहून अधिक शेतीक्षेत्र असा कंपनीचा विस्तार आहे. संलग्न शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीच्या पिकांची निवड करण्यापासून पीक पद्धतीचे मार्गदर्शन, शेतकरी वापरत असलेल्या कृषी निविष्ठा, पीक काढणी आणि विक्री या सर्व टप्प्यांवर सह्याद्री फार्म्सकडून मदत मिळते. या प्रक्रियेत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना उच्च-उत्पन्न देणार्या पिकांच्या जाती, बियाणे, खते, किटकनाशके आदी कृषी निविष्ठा, प्रत्यक्ष हवामानाची माहिती आणि कृषिमाल बाजारपेठेत नेण्यापर्यंतची माहिती पुरविण्यात येते.
कोरीस, एफएमओ, प्रोपार्को आणि इंकोफिन यांच्याकडून सह्याद्री फार्म्समध्ये केली जाणारी भांडवली गुंतवणूक कंपनीच्या विस्तारण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. गुंतवणुकीच्या प्रक्रियेत अल्पेन कॅपिटलने विशेष धोरणात्मक सल्लागार म्हणून काम केले.
कंपनीविषयी..
छोटय़ा आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत सह्याद्री फार्म्सतर्फे सहाय्य केले जाते. २०१० मध्ये १० शेतकऱ्यांच्या छोटय़ा गटाने एकत्र येत द्राक्षे युरोपात निर्यात केली. हाच छोटय़ा शेतकऱ्यांचा समूह आज चाळीसहून अधिक देशांना फळे आणि भाजीपाला निर्यात करीत आहे.
गुंतवणुकीचा फायदा..
सह्याद्री फार्म्सला प्रक्रियायुक्त फळे आणि भाजीपाला उत्पादनांची आपली क्षमता वृद्धींगत करायची आहे. प्रक्रिया पश्चात कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प, पॅक हाऊस अशा सुविधा उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी या परकीय गुंतवणुकीचा उपयोग केला जाणार आहे.