नाशिक : राज्यातील उद्योजकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि ॲग्रीकल्चर संस्थेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल वाढविण्यासाठी घटनेतील तरतुदीत बदल करण्याचा प्रस्ताव कार्यकारिणीच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे. सध्या चेंबरच्या अध्यक्षपदाची धुरा ललित गांधी यांच्याकडे आहे. गांधी जैन अल्पसंख्यांक विकास आर्थिक विकास महामंडळाचेही अध्यक्ष आहेत. मूळ तरतुदीनुसार चेंबरचा सदस्य चारपेक्षा अधिकवेळा अध्यक्ष होऊ शकत नाही. विद्यमान अध्यक्षांनी आपला कार्यकाल पूर्ण होण्या पूर्वीच घटनेत बदल केल्याचा आरोप होत आहे.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारिणी सभेत घटनेतील तरतुदींत बदल करण्याचा विषय मांडण्यात आला होता. तत्पूर्वी कोणताही तपशील न देता या सभेचा कार्यक्रम पाठविला गेल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. चेंबरच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल एक वर्षाचा आहे. चारपेक्षा अधिक वेळा म्हणजे चार वर्षापेक्षा अधिक काळ सदस्य अध्यक्ष होऊ शकत ना्ही. कार्यकारिणी सभेत हा कार्यकाल दोन वर्षांनी वाढविण्यास मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता चेंबरचा सदस्य सहा वर्ष (सहा वेळा) अध्यक्षपद सांभाळू शकतो.
घटनेतील बदलाचा विषय सर्वसाधारण सभेतही ठेवला जाणार आहे. ही सभा ज्या ठिकाणी अधिक सदस्य आहेत, तिथे होणे अभिप्रेत असते. मात्र कार्यकारिणीने जिथे सर्वात कमी सदस्य आहेत, अशा नागपूरची निवड केल्याचे सांगितले जाते. २०२१ मध्ये गांधी हे पहिल्यांदा अध्यक्ष झाले होते. पुढील काळातही अध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्यासाठी त्यांनी अखेरच्या क्षणी घटनेत बदल केल्याचे आरोप होत आहेत.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्षपद स्वीकारून आपणास अडीच वर्षांचा कालावधी झाला आहे. सध्याच्या तरतुदीनुसार आणखी दीड वर्ष काम करता येईल. अध्यक्षपद राखण्यासाठी कार्यकाल वाढविलेला नाही. मागील निवडणुकीत काही त्रुटी उघड झाल्या होत्या. उपस्थिती कशी ग्राह्य धरायची, यांसह इतर तक्रारी होत्या. निवडणूक प्रक्रियेत सुसंगत रचना असावी म्हणून घटनेत बदल केले जात आहेत. महाराष्ट्र चेंबर २०२७ मध्ये शतक महोत्सव साजरे करणार आहे. तोपर्यंत आपण अध्यक्ष राहावे, यासाठी संपूर्ण राज्यातून दबाव आहे. मात्र, तोपर्यंत आपण अध्यक्ष राहणार नाही, हे मी आधीच जाहीर केले आहे. ललित गांधी (अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर)