मनमाड – मनमाडसह जिल्ह्यातील चाकरमाने आणि प्रवाशांसाठी जीवनवाहिनी असलेली मनमाड – कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करावी, मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूल नव्याने उभारावा, अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी भुसावळ विभागाचे मंडल रेल्वे प्रबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. गोदावरी बाबतचा प्रस्ताव रेल्वे मंडळाकडे, तर उड्डाणपुलाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
या अनुषंगाने संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती अप्पर मंडल रेल प्रबंधक सुनीलकुमार सुमंत यांनी पत्राद्वारे दिली. मनमाड रेल्वे स्थानकालगत रेल्वेचा रस्त्यावरील उड्डाणपूल असून तो आता जीर्ण झाला आहे. यासंबंधी बांधकाम विभागाची बैठक घेऊन या रेल्वे उड्डाणपुलाचे परीक्षण बांधकाम विभागातर्फे करणे सुनिश्चित केले आहे. तसेच मनमाड कुर्ला – गोदावरी एक्स्प्रेस ही गाडी बंद करण्यात आली. त्याऐवजी मनमाड – मुंबई उन्हाळी विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. कोणतीही गाडी सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय हा रेल्वे मंत्रालयातर्फे घेतला जातो. आमदार कांदे यांची मागणी रेल्वे मंत्रालयास कळविण्यात आल्याचे सुमन यांनी पत्रात नमूद केले.
हेही वाचा – उष्णतेच्या लाटेने जळगावकर घामेघूम; उष्माघाताचा धोका वाढला
मनमाड कुर्ला-गोदावरी एक्स्प्रेसने श्रमिक कामगार, चाकरमाने, मनमाड, नांदगाव येथून नाशिक, मुंबईसाठी प्रवास करत असतात. त्यांच्या सोईसाठी गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. शहरातील उड्डाणपुलाचा कालावधी संपुष्टात आला आहे. तरीही त्याचा वापर सुरू आहे. अवजड वाहने या पुलावरून धावतात. ही मोठी जोखीम आहे. पुलाची उपयोगिता संपल्याने हा पूल नव्याने उभारावा, याकडे आमदार कांदे यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते.