नाशिक – सार्वजनिक जलद वाहतुकीची गरज लक्षात घेऊन शहरातील संकल्पित मेट्रो निओच्या प्रस्तावाचे महामेट्रोच्यावतीने पंतप्रधान कार्यालयात सादरीकरण करण्यात आले. देशातील काही शहरांनी यापूर्वीच केंद्राकडे नॅनो मेट्रोचे प्रस्ताव सादर केले आहेत. या सर्वांचा विचार करून देशांतर्गत साधन सामग्रीच्या आधारे संपूर्ण देशात एकाच स्वरुपात नॅनो मेट्रो ठेवण्याचा केंद्राचा मनोदय आहे. मेट्रो निओचे सादरीकरण झाल्यामुळे अंतिम निर्णयाची शासनासह मनपा आणि महामेट्रोला प्रतीक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> नाशिक: काॅपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविणे आवश्यक; जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

महामेट्रोचे अधिकारी आणि मनपाचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदींच्या उपस्थितीत दिल्लीत मेट्रो निओच्या प्रस्तावाचे सादरीकरण झाले. या सादरीकरणाबाबत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी अधिक स्पष्टता करण्यास नकार दिला. साधारणत: पाच वर्षांपूर्वी महा मेट्रोने शहरासाठी टायरवर आधारित ‘मेट्रो निओ’ची अनोखी संकल्पना मांडली होती. केंद्र आणि राज्य सरकारची मान्यता मिळूनही हा प्रकल्प पुढे सरकला नाही. त्याच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त होऊ लागली. मागील आठवड्यात भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो निओचे लवकरच पंतप्रधान कार्यालयात सादरीकरण होणार असल्याचे म्हटले होते. देशात पारंपरिक व परिवर्तनीय अशा दोन प्रकारच्या मेट्रो असाव्यात, अशी पंतप्रधानांची भूमिका आहे.

नाशिकच्या मेट्रो निओच्या प्रस्ताव सादरीकरणानंतर देशातील अन्य भागातून नॅनो मेट्रोसारखे वेगवेगळे प्रस्ताव सादर झाले होते. या सर्वांचा अभ्यास करून एकाच स्वरुपातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले गेल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. देशांतर्गत साधन, सामग्रीने मेट्रो साकारण्याचे नियोजन आहे. नाशिकच्या मेट्रो निओचा तसाच प्रकल्प असून तो परिवर्तनीय प्रकारातील आहे. या प्रकल्पास पंतप्रधान कार्यालयाकडून अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. सादरीकरणानंतर दीड-दोन महिन्यात निर्णय होईल, असे फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे महामेट्रोसह मनपाचे पंतप्रधान कार्यालयाच्या निर्णयाकडे लक्ष आहे.

हेही वाचा >>> नाशिक: पोलीस अधिकाऱ्यावरील हल्ला प्रकरण; बडगुजर यांना सक्तमजुरी, जामीनही मंजूर

वैशिष्ठ्ये काय ? मेट्रो निओची संकल्पना मांडताना देशातील या प्रकारची पहिलीच व्यवस्था ठरणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्या अंतर्गत गंगापूर-नाशिकरोड आणि गंगापूर-मुंबईनाका या दरम्यान उड्डाण पुलासारख्या स्वतंत्र मार्गिका तयार करण्याचे प्रस्तावित आहे. इतर भागांतील नागरिकांना सेवेचा लाभ घेता यावा म्हणून अन्य दोन पुरवठा मार्गावर इलेक्ट्रिक बसची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. पर्यावरणस्नेही, प्रदूषण-आवाजरहित, आरामदायी, किफायतशीर अशी ही सेवा तीन ते चार दशकांची गरज भागवेल, असे सांगितले जाते. रबरी चाके असणाऱ्या या मेट्रोची २००-३०० प्रवाशांची वहन क्षमता आहे. ती इलेक्ट्रिकवर धावेल. स्वयंचलित दरवाजे, प्रवाशांना माहिती देण्याची अंतर्गत व्यवस्था, प्रदूषण-आवाजरहित, पर्यावरणस्नेही अशी तिची वैशिष्ठ्ये सांगितली गेली. सुमारे दोन हजार कोटींचा हा प्रकल्प चार वर्षात साकारण्याचे नियोजन होते. परंतु, अंतिम मान्यता न मिळाल्याने प्रकल्प खर्चात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.