नंदुरबार : आदिवासींचे जल, जंगल, जमीन या संदर्भातील सर्व दावे निकाली काढण्यात येतील, फेटाळलेल्या दाव्यांची फेरतपासणी करण्यात येईल, वन संवर्धन आणि भूसंपादन कायदे अधिक मजबूत केले जातील तसेच देशातील ज्या भागात आदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तो भाग घटनेच्या सहाव्या परिशिष्टात समावेश करण्यात येईल आदी आश्वासने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी दिली. भारत जोडो न्याययात्रेनिमित्त दाखल झालेल्या राहुल यांचे येथे जोरदार स्वागत करण्यात आलेे.
हेही वाचा >>> ‘कोविड-१९’ महासाथीत आयुर्मानात दीड वर्षांनी घट
भारत जोडो न्याय यात्रेने मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश केला. यानिमित्त नंदुरबार येथील सीबी मैदानावर आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी यांनी, जय आदिवासी नारा देत आदिवासी बांधवांच्या प्रश्नाशी निगडीत मुद्यांना हात घालताना केंद्रातील भाजप सरकारने आदिवासींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला, आदिवासींसाठी तयार केलेल्या जाहीरनाम्यातील विषय मांडत त्यांना पुन्हा काँग्रेसकडे खेचण्याचा प्रयत्न केला. आदिवासी या देशाचे मूळ मालक असून आदिवासी शब्दाशी जल, जंगल, जमिनीचा अधिकार जोडला जातो, परंतुवनवासी शब्दाबरोबर जोडला जात नसल्याने भाजप आदिवासींना वनवासी म्हणत असल्याचा आरोप गांधी यांनी केला.